Thursday, October 22, 2026
Homeक्राईमNashik Crime News : प्रेस कर्मचाऱ्याचा भलताच 'उद्योग'; सव्वा लाखांच्या एमडी ड्रग्जसह...

Nashik Crime News : प्रेस कर्मचाऱ्याचा भलताच ‘उद्योग’; सव्वा लाखांच्या एमडी ड्रग्जसह गजाआड

​अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची कारवाई

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चलनी नोटा आणि अतिसंवेदनशील सरकारी दस्तऐवजांची छपाई करणाऱ्या नाशिक रोड (Nashik Road) येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसचा ज्युनिअर टेक्निशिअन अंमली पदार्थांच्या (एमडी) विक्री व तस्करीच्या जाळ्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या (एएनटीएफ) नाशिक युनिटने सापळा रचून संशयित करण किशोर पठाडे (वय २४, रा. रॉयल रो हाऊस, चेहेडी पंपिंग, नाशिक रोड) या कर्मचाऱ्याला (Employee) एक लाख २५ हजार रुपये किमतीच्या ६२.६५० ग्रॅम एमडीसह (मेफेड्रॉन) बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

भारत सरकारच्या (Indian Government) मुद्रणालयातील कर्मचारीच अंमली पदार्थांच्या तस्करीत आणि विक्रीत सहभागी असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने (दि. ३) मध्यरात्री नाशिक-पुणे महामार्गावरील निसर्ग लॉन्ससमोरील सर्व्हिस रोडवर सापळा रचला. संशयित करण पठाडे हा त्या ठिकाणी एमडीची विक्री करण्यासाठी आला असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक लाख २५ हजार रुपयांचा ६२.६५० ग्रॅम वजनाचे एमडी, प्रेसलॉक पिशव्या, एक छाेटा इलेक्ट्रॉनिक वजन काटा व ॲक्सेस मोपेड (एमएच १५ केएम ७८३९) असा एकूण एक लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एएनटीएफच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. ए. व्यवहारे, फिर्यादी पोलीस शिपाई नितीन ढेरिंगे यांच्या पथकाने केली.

​पुरवठादाराचा शाेध

प्राथमिक चौकशीत एमडीचा (MD Drugs) हा साठा नाशिक शहरातील संशयित अभिषेक चंद्रमोहन कुटे (वय २८) याच्याकडून आणल्याची कबुली पठाडे याने दिली आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोघे संगनमत करून शहरात बेकायदेशीररीत्या एमडीची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मुख्य संशयित अभिषेक कुटे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

चांगले वेतन व अन् एमडी

​सुरक्षा व्यवस्थेवर आणि तरुणाईच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह जिथे देशाचे शासकीय दस्तऐवज छापले जातात, अशा इंडिया सिक्युरिटी प्रेससारख्या संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या तरुण तंत्रज्ञाचा अंमली पदार्थ तस्करीत सहभाग आढळणे, ही गंभीर बाब आहे. उच्च दर्जाची नोकरी आणि चांगले वेतन असतानाही २४ वर्षांचा तरुण एमडीसारख्या घातक ड्रग्जच्या जाळ्यात कसा अडकला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

ताज्या बातम्या