Sunday, November 15, 2026
Homeक्राईमNashik Crime News : रस्त्यावर ज्वलनशील स्टंटबाजी! उत्तमनगर परिसरात पेटते फटाके घेऊन गल्लीत...

Nashik Crime News : रस्त्यावर ज्वलनशील स्टंटबाजी! उत्तमनगर परिसरात पेटते फटाके घेऊन गल्लीत धाव

नागरिकांच्या सतर्कतेमुळे हुल्लडबाजांचे धाबे दणाणले

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सणासुदीच्या आनंदावर विरजण घालत रहिवासी भागात पेटत्या फटाक्यांच्या लडी व ज्वलनशील पदार्थ हवेत फिरवून नागरिकांच्या (Citizen) जीवितास धोका निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांचा प्रताप सुजाण नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. उत्तमनगर येथील बुद्ध विहार व देवी मंदिराशेजारील परिसरात घडलेल्या या प्रकाराचे व्हिडिओ सुजाण नागरिकांनी थेट पोलिसांना पाठवल्यानंतर अंबड पोलिसांनी (Ambad Police) दखल घेत संशयित दर्शन कानवडे व त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.  

- Advertisement -

पाेलिसांच्या (Police) माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उत्तमनगर येथील बुद्ध विहार आणि देवी मंदिराशेजारील गल्लीत हा प्रकार घडला. संशयित दर्शन कानवडे याने हातामध्ये पेटत्या फटाक्यांची लड घेऊन ती रहिवासी गल्लीतील घरे आणि उभी असलेली वाहने यांच्या दिशेने नेत धाव घेतली. तर त्याच्या इतर साथीदारांनी दोरीला फटाक्यांसारखा ज्वलनशील पदार्थ बांधून तो एकमेकांवर व हवेत गोल-गोल फिरवत निष्काळजीपणाने स्टंटबाजी केली.

या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास व वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाला होता. सणाच्या उत्साहाआड सुरू असलेला हा जीवघेणा प्रकार काही सुजाण नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला आणि तातडीने अंबड पोलिसांना पाठवला. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गणेश कोठुळे (वय ३६) यांनी व्हिडीओ पाहून पाेलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी यांच्या आदेशाने प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकार पक्षाच्यावतीने फिर्याद दाखल केली.  

​गंभीर कलमान्वये गुन्हा

अंबड पोलीस ठाण्यात संशयित दर्शन कानवडे आणि त्याच्या अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २७०, २९२, १२५, २८७ आणि २८८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर उपनिरीक्षक कुवर आणि हवालदार रफिक शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तपास पोलीस हवालदार शेख करत असून, पसार साथीदारांचा शोध घेतला जात आहे. 

नागरिकांच्या सतर्कतेचे कौतुक

सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करून दहशत माजवणाऱ्या किंवा इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी उत्तमनगरमधील नागरिकांनी दाखवलेली सजगता कौतुकास्पद ठरली आहे. केवळ बघ्याची भूमिका न घेता थेट पुराव्यानिशी पोलिसांना माहिती दिल्याने तातडीने कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणे शक्य झाले आहे.  

 

ताज्या बातम्या

Nashik News : दोन महिन्यांत प्रशासकीय फेरबदल; नाशिक पोलिसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik ​आगामी सिंहस्थाच्या (Simhastha) पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस (Nashik City Police) दलाचे संपूर्ण रूपडे पालटणार असून, यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी...