Tuesday, September 29, 2026
HomeनाशिकNashik Crime News : चोरट्यांनी मेडिकल फोडले अन् सॅनिटरी पॅड्ससह 'या' वस्तू...

Nashik Crime News : चोरट्यांनी मेडिकल फोडले अन् सॅनिटरी पॅड्ससह ‘या’ वस्तू नेल्या चोरून; गुन्हा दाखल

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

येथील वडाळा-पाथर्डी रोड लगतच्या परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून सलग दुसऱ्या आठवड्यात घरफोडीची (Robbery) घटना घडली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकाटून रोख रक्कमेसह किमती साहित्याची चोरी केली. रविवारी (दि. ९) मध्यरात्री दोन ते चार वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत रोख ४५ हजार रुपयांसह एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी अक्षय अनिल बागड (रा. विजयनगर, सिडको) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagra Police Station) तक्रार दाखल केली आहे. बागड यांचे कलानगर चौकात ‘सुदर्शन मेडिकल’ नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर कशाच्या तरी साहाय्याने उचकाटून आत प्रवेश केला. दुकानातील ४५ हजार रुपयांची रोख रक्कम, किमती कॅडबरी, दाढी करण्याचे सामान, पेन क्लिअर सिरपच्या दोन बाटल्या आणि सॅनिटरी पॅड्स असा ऐवज चोरून नेला.

पुराव नष्ट करण्यासाठी DVR पळवला

तसेच आपली ओळख पटू नये यासाठी संशयित चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची (CCTV Camera) तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर (DVR) देखील सोबत चोरून नेला. या धाडसी चोरीमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करत आहे.

पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान

वडाळा-पाथर्डी रोडवर गेल्या आठवड्यात पतंजली स्टोअर्स, माऊली ज्वेलर्स, संसार शोभा स्टील आणि स्वामी कलेक्शन या दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता मुख्य वर्दळीच्या कलानगर चौकातील सुदर्शन मेडिकलला लक्ष्य करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या (Police) गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सलग घडणाऱ्या या चोऱ्यांमुळे चोरट्यांना गजाआड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

ताज्या बातम्या