
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
दिवसा ठिकठिकाणी इलेक्ट्रीशियन म्हणून काम करायचे आणि रात्रीच्या वेळी इमारतींमधून लाखो रुपयांची कन्सील कॉपर वायर लांबवायची, अशा भामट्यांच्या टोळीचा आडगाव पोलिसांच्या (Police) गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. रात्रगस्तीदरम्यान संशयितरीत्या फिरणाऱ्या तीन अट्टल चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वाहनांसह ५ लाख ५ हजार ७०० रुपयांचा (Cash) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रदीप रोहिदास बेलदार (रा. सातपूर), दिनेश राजेंद्र अहिरे (रा. सिडको) आणि विशाल रोहिदास कोळी (रा. सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदूर नाका – जत्रा लिंक रोडवरील ‘हायलँड स्काय’ इमारतीमधून डिसेंबर २०२५ मध्ये तब्बल ३ लाख रुपये किमतीची कॉपर वायर चोरीला गेली होती. याप्रकरणी अली जनामुद्दीन सिद्दिकी यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात (Aadgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
३१ जुलैच्या मध्यरात्री आडगाव डी.बी. पथकाचे कर्मचारी इच्छामणी नगर परिसरात रात्रगस्त घालत असताना, एका यामाहा एफझेड मोटारसायकलवरून तिघे संशयितरीत्या जाताना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळील पोत्यात विजेच्या वायरचे तुकडे आणि खिशात वायर कट करण्याचे कटर आढळून आले. पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्यांनी हायलँड टॉवरमधील चोरीची कबुली दिली. संशयितांच्या चौकशीनंतर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी विजेच्या वायर व मशिनरी, रेनॉल्ट क्विड चारचाकी, यामाहा एफझेड मोटारसायकल, टीव्हीएस स्कुटी असा एकूण ५,०५,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeeep Karnik) पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, प्रभारी निरीक्षक गौतम वावळे, दिलीप राठोड, सहायक निरीक्षक निखिल बोंडे, lसतीश जगदाळे, उपनिरीक्षक भगवंत घोडे तसेच अंमलदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख,सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे व सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार इम्रान शेख करत आहेत.




