नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भद्रकाली देवी मंदिरातील (Bhadrakali Devi Temple) शतकांपेक्षा जुनी आणि मौल्यवान मानली जाणारी पितळी सिंहमूर्ती चोरीला गेल्यानंतर अवघ्या एका तासात गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, या कारवाईत (Action) तांत्रिक तपासापेक्षा पोलिसांच्या ‘ह्युमन इंटेलिजन्स’ आणि तातडीने रचलेला सापळा निर्णायक ठरला आहे. सामान्यतः चोरीच्या घटनांनंतर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि डिजिटल सर्व्हेलन्सवर अवलंबून असतात. परंतु, या प्रकरणात भद्रकाली ते अंबड परिसरातील गुन्हे शाखेच्या खबऱ्यांचे जाळे अधिक गतिमान ठरले.
भद्रकालीतील दूध बाजार नाका येथून चोरी झालेली ही मौल्यवान मूर्ती पाथर्डी फाटा मार्गे थेट अंबड गाव परिसरात विक्रीसाठी हलवली जात असल्याची माहिती अंमलदार प्रवीण वानखेडे आणि जितेंद्र वजीरे यांना अवघ्या काही मिनिटांत मिळाली. संशयित ही जुनी मूर्ती भंगार व्यावसायिक किंवा एखाद्या मध्यस्थाला विकण्याच्या तयारीत असतानाच, इंडोलाईन फर्निचर कंपनीजवळ पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत मच्छिंद्र राजू पवार (वय ३८, रा. घरकुल वसाहत, चुंचाळे अंबड) आणि राजू अब्बास बागवान (वय २६, फिरस्ता, मूळ रा. जालना) यांना पकडण्यात आले.
दरम्यान, याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली मूर्ती तत्काळ हस्तगत केल्याबद्दल भद्रकाली देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने गुन्हे शाखेचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी व सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पीएसआय संजय सानप आणि पथकाने ही कारवाई केली.




