नाशिक | प्रतिनिधी
दुसऱ्यांच्या मनातील कोळीष्टके दूर करून त्यांना जगण्याची नवी उमेद देणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाच्याच घरात शुक्रवारी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या पत्नी व आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (वय ४०) यांनी घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
ही घटना गंगापूर रोडवरील डीकेनगर भागातील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी (दि. ६) सकाळी घडली. डॉ. मनीषा यांनी घरात गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्यांच्या भावाने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. नीलेश जेजुरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हजारो रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या आणि मानसिक व्याधींवर मात करायला शिकवणाऱ्या तज्ज्ञाच्याच सुशिक्षित पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याने मनाच्या गुंतागुंतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
डॉ. मनीषा यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्या स्वतः वैद्यकीय क्षेत्रात असल्याने आणि घरचे वातावरणही सुशिक्षित असल्याने या घटनेमागे नेमके काय दडले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मनीषा या गेल्या काही वर्षांपासून पंडित कॉलनीत सर्वम आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी अँन्ड पंचकर्म सेंटरद्वारे कार्यरत होत्या.





