Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik Crime : दुचाकी चोरांकडून ६ गाड्या जप्त; पंचवटी गुन्हे शोध पथकाची...

Nashik Crime : दुचाकी चोरांकडून ६ गाड्या जप्त; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन सराईतांसह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सहा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.दि. १५ फेब्रुवारी रोजी अमृतधाम – अयोध्यानगरी परिसरातील त्रिकोणी बंगल्याजवळील साकार प्राईड येथून एका दुचाकीची चोरी झाली होती.

- Advertisement -

या घटनेप्रकरणी दि. २६ फेब्रुवारी रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शोधपथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासा दरम्यान दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी परिसरात एमएसईबी कार्यालयाजवळ दोन तरुण एका दुचाकीला (एमएच १५ केटी ०१३७) संशयास्पदरित्या सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलिसांनी तत्काळ त्यांना अडवून चौकशी केली असता, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.पोलीस ठाण्यात नेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सुरज मुन्ना धोत्रे (वय २१, रा. तेलंगवाडी, फुलेनगर, पेठरोड) व राज सुभाष धोत्रे (वय १९, रा. वडारवाडी, पेठरोड) अशी सांगितली. संबंधित दुचाकीचा क्रमांक तपासला असता तीच गाडी साकार प्राईड येथून चोरीस गेलेली असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, पुढील चौकशीत संशयितांनी दोन विधीसंघर्षित बालकांच्या मदतीने शहरातील विविध भागांतून आणखी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण सहा दुचाकी हस्तगत केल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाने पार पाडली.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...