नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या विहितगाव (Vihitgaon) येथे वालदेवी नदी (Valdevi River) पुलाजवळ दबा धरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांची लुटमार करण्याच्या उद्देशाने जमलेल्या सात जणांच्या एका टोळीवर नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) कारवाई केली आहे. यातील चौघा जणांना रंगेहात पकडले असून, तिघे फरार झाले आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी विहितगाव येथील बागुल नगरपरिसरात गस्त घालत असताना सहा ते सात इसम पोलिसांना पाहताच झाडाझुडपात पळाले. यांनतर ही माहिती पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी वरिष्ठांना कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पंडित अहिरे, अविनाश देवरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, योगेश रांगडे, विशाल कुवर, समाधान वाजे व अजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी पोलिसांनी (Police) अंधारात झाडाझुडपात शोध मोहिम राबवून सराईत गुन्हेगार तेजस अनिल गांगुर्डे उर्फ हैदर अली खान (रा. राजवाडा, देवळाली गाव), रहमान जाफर शेख, समीर जाकीर शेख (रा. विजय नगर, जय भवानीरोड) आणि गौरव आनंद बाविस्कर (रा. देवळाली गाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, दोन कोयते तसेच दरोड्याच्या तयारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. मात्र, अंधाराचा फायदा घेत तीन संशयित रेल्वे ट्रॅक क्रॉसिंगमार्गे पसार झाले.
दरम्यान, चौकशीत या संशयितांनी मार्गावरील वाहनांची लूट करण्याच्या उद्देशाने जमल्याचे कबूल केले. तर नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या (Nashik Road Police Station) गुन्हे शोध पथकाच्या सतर्क गस्तीमुळे दरोडा टळल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.




