नाशिक | प्रतिनिधी | Nashik
फेब्रुवारी २०२४ मध्ये सराईत गुंड संदेश काजळे (Sandesh Kajale) याची पंचवटीतील निमाणीत निर्दयीपणे हत्या करून मृतदेह मोखाडा तालुक्यातील (Mokhada Taluka) जंगलात अर्धवट जळणाऱ्या सराईतांमधील मुख्य सूत्रधाराचा शोध लावण्यात पोलिसांना (Police) एक वर्षनि यश आले. विशेष म्हणजे पकडलेला संशयित काजळेच्या हत्येचा ‘मास्टरमाइंड’ असून हत्या केल्यानंतर त्याने कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे भक्तांच्या माथी ‘टिळे’ लावून भिक्षुकी करत उदरनिर्वाह केल्याचे समोर आले आहे.
रणजित संजय आहेर (२४, रा. राजवाडा, पंचवटी कारंजाजवळ, पंचवटी) असे सराईताचेनाव असून शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने गुरुवारी (दि. २०) येवला तालुक्यातील (Yeola Taluka)अंदरसूल येथे सापळा रचून आहेरला ताब्यात घेतले. फेब्रुवारी २०२४ मध्ये आहेर सराईत गुंड व अवैध सावकारी करणाऱ्या संदेश चंद्रकांत काजळे (३५, रा. माताजी चौक, विजयनगर, सिडको) याचा अर्धवट जाळलेला मृतदेह मोखाडा पोलिसांच्या हद्दीतील ताकपाडाच्या निर्जन जंगलात आढळला होता.
यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून पंचवटी पोलिसांसह (Panchvati Police) युनिट एकनेसखोल तपास केला असता ९ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री संदेश काजळे हा निमाणीतील सूर्या हॉस्पिटलच्या मागील पार्किमध्ये आला असता त्याचे संशयित मित्र नितीन ऊर्फ पप्पू चौगुले (रा. ड्रीम कॅसलमागे, मखमलाबादरोड), रणजित आहेर व स्वप्निल दिनेश उन्हवणे (२३. दोघे रा. राजवाडा, पंचवटी), पवन भालेराव (रा. त्र्यंबकेश्वर राजवाडा) आणि इतरात आर्थिक देवाणघेवाणीसह अन्य कारणातून वाद झाले.
दरम्यान, यानंतर काजळेस मद्याच्या नशेत मारहाण करून इको कारमध्ये ढकलून अपहरण करत रणजित आहेर व नितीन चौघुले यांनी कोयता व लोखंडे रॉडने मारहाण करून ठार मारल्यावर पेट्रोल ओतून जाळून टाकले होते. यानंतर पोलिसांनी स्वप्निल उन्हवणे यास कारसह त्र्यंबक भागातून अटक (Arrested) केली होती. त्यानंतर चौघुलेसह इतरांनाही अटक केली होती. मात्र, आहेर हा पसारच होता.
पोल्ट्रीमध्ये करायचा काम
आहेर याने काजळेचा खून केल्यावर कर्नाटक राज्यातील गुरुदेव दत्ताचे जागृत देवस्थान समजले जाणारे गाणगापूर गाठत तीन महिने भिक्षुकी केली. त्यानंतर तो नातलगांच्या ओळखीतून येवल्यातील अंदरसूल येथे आला. त्याने येथे पोल्ट्री फार्मची देखरेख करण्याचे काम मिळवले. मात्र, गुंडाविरोधी पथकाने त्याच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले असता कुटुंब वारंवार येवला व अंदरसूल येथे येत-जात असल्याची टीप मिळवली. त्यानंतर कुटुंबाचे ‘सीडीआर’ काढल्यावर आहेर हा अंदरसूल येथे ओळख लपवून पोल्ट्रीत काम करत असल्याचे कळाले. त्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी तथा सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी व पथकाने दोन दिवस सापळा रचून त्याला गजाआड केले.
काजळेला यासाठी संपवले!
सराईत असलेला काजळे काही वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात तुरुंगात होता. त्यावेळी त्याने स्वप्निल उन्हवणे या सराईताशी पंगा घेऊन त्याला तुरुंगातच विवस्त्र करून मारहाण केली होती. हाच राग उन्हवणे याने डोक्यात ठेवला होता. दरम्यान, उन्हवणे, चौघुलेव आहेर एकमेकांचे ‘खास’ मित्र असल्याने त्यांनी काजळेशी वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार केले. मात्र, कालांतराने व्यवहार फिस्कटल्याने काजळे व संशयितांची दुश्मनी वाढली. ज्या दिवशी खून करण्यात आला त्या रात्री आहेर याने काजळेला दमदाटी करून चौघुलेसह उन्हवणेला निमाणीत बोलवून घेत त्याचा डाव संपवला. विशेष म्हणजे काजळेला संपवण्याची सर्वच जबाबदारी आहेर याने उचलली होती, असे तपासात समोर आले आहे.




