नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राजकारणाआड अवैध सावकारीसह ‘वसुली’साठी उबाठाच्या ‘नाशिक पूर्व’ विधानसभा मतदारसंघाचा संघटक संशयित विशाल सुभाष कदम याने थेट बिल्डरचे अपहरण (Kidnapping Builder) करुन त्याच्या पत्नीस धमकावल्याचा खळबळजनक प्रकार आडगाव शिवारात घडला आहे. त्याला व नातेवाईक अमित मधुकर पाटील याला अखेर अटक (Arrested) करण्यात आली असून, दोघांनाही शनिवारी (दि. २५) पोलिसांनी दिवाळीचे ‘कडक’ लाडू दिले. त्यानंतर दोघांनीही हात जोडून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अशा घोषणा दिल्या. दरम्यान, कदमच्या या ‘विशाल’ प्रतापाने म्हसरुळमधील नागरिकांना धक्का बसला असून, कदमचे आणखी ‘काळे कारनामे’ बाहेर येण्याची शक्यता आहे. तर, या गुन्ह्यात सिद्धेश्वर रामदास आंडे, शंकर गोवर्धन वाडेकर हे संशयित पसार असून त्यांचा शोध सुरु आहे.
अमृतधाम येथील सनराईज रेसिडेन्सीत राहणाऱ्या सारिका विजय शिरोडे या गृहिणीच्या फिर्यादीनुसार, सन २०२० पासून १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पती विजय शिरोडे पंचवटीसह (Panchvati) अन्य परिसरात बांधकाम व्यवसाय करीत होते. त्यांनी व्यवसायानिमित्त विशाल कदम याच्याकडून काही रक्कम हातउसनवार घेतली होती. मात्र, या रकमेवर कदमने मनमानी ‘व्याज’ वसूल केले. तर, अधिकच्या रक्कम वसुलीसाठी कदमसह आंडे, वाडेकर व पाटील यांनी शिरोडे यांचे वारंवार अपहरण करीत कागदपत्रांवर जबरीने त्यांच्या सह्या करवून घेतल्या.
दरम्यान, चौघेही ‘सतत अन्याय अत्याचार’ करत असल्याने शिरोडे कुटुंब जेरीस आले होते. अशातच कदमने शिरोडे यांना मोबाईलवरुन (Mobile) धमकी देत ‘प्रकरण मिटव नाहीतर तुझा गेम करून टाकीन’, असे धमकावल्याचे नमूद आहे. तपास आडगावचे वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील करीत आहे. अटकेतील कदमसह पाटीलला न्यायालयाने पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
शिरोडेंची मालमत्ता हडपली
वरील कालावधीत कदमसह त्याच्या गुंडांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता धमकावून उपनिबंधक कार्यालयात खरेदीखत व साठेखत दस्त नोंद करुन हडप केल्याचा दावा शिरोडे यांनी फिर्यादीत केला आहे. विशेष म्हणजे ‘कायद्याच्या कचाट्यात अडकू नये’, यासाठी कदमने शिरोडे यांच्या मालमत्ता हडपल्यानंतर सर्वच नोंदणी व्यवहार खरेदीने झाले असे भासवून पैसे ऑनलाईन वर्ग केले. मात्र, पुन्हा हे पैसे स्वतः सह आंडे, वाडेकर व पाटीलच्या बँक खात्यात वर्ग करण्यास शिरोडेंना भाग पाडले. यावरच न थांबता चौघांनीही शिरोडे यांना ठार मारण्याची धमकी देऊन आडे याने प्रॉपर्टी नावे करण्यासाठी शिरोडेंना पैशांची मागणी केली.
नागरिक भीतीच्या सावटातून बाहेर!
शहरात पोस्टरबाजी करून बेकायदेशीरपणे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचे प्रकार सुरु होते. त्यातच, मागील साडेनऊ महिन्यांत ४३ खून झाल्याने पोलिसांबाबत नाशिक करांनी टिकेची झोड उठविली. यानंतर पोलिसांनी धडक कारवाया सुरु करुन गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात राजकारण्यांसह त्यांच्या समर्थकांसह सराईतांना गजाआड करून दिवाळीपूर्वी ‘फराळ’ दिले. हा सिलसिला सुरुच असून एक एक गंभीर प्रकार उजेडात येऊ लागले आहेत. नागरिकही निडरपणे तक्रारी करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.
मुद्दे
- कदम गँगची म्हसरुळमधील दहशत संपुष्टात
- अमित पाटील हा कदमचा ‘नातलग’
- कदम गुलमोहोरनगरातील रहिवासी
- निवडणूक लढविण्याची तयारी गुन्ह्यामुळे फिस्कटली
- कदम, आंडे, वाडेकर व पाटील यांची ‘संघटित’ टोळी
- खरेदी-विक्रीच्या नावाखाली लूटमार, अपहरण अवैध सावकारीचा धंदा
- शिरोडेंकडून अमित पाटीलने पंधरा लाख रुपये उकळले
- चौघांनीही अनेकांच्या प्रॉपर्टया बळकावल्या
- शिरोडेचे चार फ्लॅटस्, जमिनी असा २ कोटींहून अधिकचा मुद्देमाल गिळला





