दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
शहरातील आश्रय लॉजमधील (lodge) एका रुममधून बनावट नोटा, प्रिंटर व मोबाईल (Fake Notes and Printer) असा एकुण २० हजार ७४४ रुपयांचा ऐवज जप्त करुन तीन संशयितांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांनी (Dindori Police) दिलेली माहीती अशी की, दिंडोरी शहरातील आश्रय लॉजमधील रुम नंबर २०३ मध्ये बनावट नोटा तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी छापा (Raid) टाकून ए फोर पेपर, प्रिंटर, बनावट चलनी नोटा असा एकुण २० हजार ७४४ रुपयांचा ऐवज जप्त केला.
दरम्यान, याप्रकरणी किरण दशरथ माळेकर, ज्ञानेश्वर सदु गायकवाड व अनिल बाळु माळेकर यांना अटक करण्यात आली आहे. या संशयितांनी (Suspected) यापूर्वी बनावट नोटा चलनात आणल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सदर टोळीची सखोल माहिती व पार्श्वभूमी पोलीस तपासून बघत आहेत.