नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील विविध मालाविरुद्धच्या गुन्ह्यात चोरट्यांनी (Thieves) पळविलेल्या दागिन्यांसह वाहने व रोख रक्कम शहर पोलिसांनी रिकव्हर करत संबंधित फिर्यादींना सन्मानाने परत करण्यात आली आहेत. पोलिसांनी (Police) बुधवारी (दि. ८) तब्बल दोन कोटी ८८ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द करताना गुन्ह्यांची नोंद करण्यासह उकल करण्यास प्राधान्य असल्याचे मत नाशिक पोलीस आयुक्तालयाने मांडले. त्यावेळी नागरिकांनीही पोलिसांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये, ‘पोलीस रेझिंग’ सप्ताहानिमित्ताने नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे बुधवारी (दि. ८) दुपारी ३ वाजता भीष्मराज बाम सभागृहात मुद्देमाल परतावा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, झोन एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हेशाखेचे प्रशांत बच्छाव, झोन दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी मंचावर होते. तेव्हा २ कोटी ८८ लाख २७ हजार ९९ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला.
दरम्यान, या कार्यक्रमात (Program) सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात काही फिर्यादींनी तक्रार नोंदवण्यापासून तपास व मुद्देमाल परत करेपर्यंत पोलिसांच्या सहकार्यासंदर्भात मत मांडले. पोलिसांची तत्पर मदत, तांत्रिक व सबळ पुराव्यांसह जलद शोधकार्यामुळे मुद्देमाल परत मिळाल्याचे प्रत्येकाने आवर्जून सांगितले.
आतापर्यंत १२ कोटी परत
आयुक्तालयातर्फे उकल झालेल्या गुन्ह्यांमध्ये ९ वेळा मुद्देमाल परत करण्यात आले. त्यामध्ये १२ कोटी, दोन लाख, २८ हजार ४९८ रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. त्याच्या नोंदी ठेवण्यासह मुद्देमाल सुरक्षित राखून ठेवणाऱ्या ठाणेनिहाय कारकूनचेही कार्यक्रमात कौतुक करण्यात आले. सर्वाधिक मुद्देमाल हा दागिने व रोख रकमेच्या स्वरुपात रिकव्हर झाला आहे.
इतका मुद्देमाल परत
सोन्या-चांदीचे दागिने : १ कोटी ६७ लाख ५३ हजार ६६९ रुपये
रोख रक्कम : ४७ लाख ५६ हजार ५३० रुपये
दुचाकी: ११ लाख ८७ हजार पाचशे रुपये
मोटार वाहने : २३ लाख ७० हजार रुपये
मोबाइल : २९ लाख २५ हजार नऊशे रुपये
रोख रक्कम : ७ लाख ३३ हजार पाचशे रुपये
एकूण : २ कोटी ८८ लाख २७ हजार ९९ रुपये