नाशिक | Nashik
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे सर्वाधिकार प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) आहेत. असे असताना बेशिस्त वाहतुकीला शिस्त, रिक्षा चालकांचे वर्तन सुधारण्यासह तसेच अनेक वाहनांच्या ‘पेड’ नंबरप्लेटवर ‘भाऊ, नाना, दादा, आप्पा व भाई’ मिरविणाऱ्या चालकांवर शहर पोलीस कठोर कारवाई करत आहेत. कारवाईचे स्वागत होत असले तरी अशा स्वरुपाच्या कारवाईत ‘आरटीओ विभाग अग्रभागी असणे आवश्यक असताना त्यांनी कारवायांचा ‘धडाका’ करण्यापेक्षा नेहमीप्रमाणे ‘झोपेचे सोंग’ घेतल्याचे दिसून येत आहे.
शहर वाहतुकीला शिस्त लागण्यासह व काही रिक्षाचालकांची ‘मुजोरी’ मोडीत काढण्यासाठी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने वाहतुक शाखेच्या उपायुक्त किरिथिका सी. एम. आणि सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे आवश्यक उपाय योजित आहेत. त्यानुसार, पोलीस ठाणे व वाहतुक शाखेची सात पथके रिक्षाचालकांवर कारवाई करत आहे. त्यातच, आता खिळखिळ्या झालेल्या शहर वाहतूक व्यवस्थेला वटणीवर आणण्यासाठी रिक्षा चालकांवर धडक कारवाई करतानाच पोलिसांनी सर्व प्रकारच्या वाहन चालकांच्या दिशेने मोर्चा वळविला आहे. नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांना ‘ट्रैफिक एज्युकेशन पार्क मध्ये सक्तीने दोन तासांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु केली जात असून वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा हा प्रयोग कितपत यशस्वी होणार याकडे नाशिककरांचे लक्ष आहे. दरम्यान, वाहनांचे एकाहून एक मॉडेल्स बाजारात येत असतानाच त्यांना शोभेशी नंबर प्लेट असावी, यासाठी ‘फॅन्सी’ नंबर प्लेटची क्रेझ वाढती आहे.
दरम्यान, यामुळे नंबर प्लेटसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेले नियम व कायदा केवळ कागदावरच असल्याचे दिसते. उघडपणे सुरू असलेला हा प्रकार बघूनही प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करत असून आरटीओ कार्यालय आकर्षक नंबरसह ‘सिरिज’ विक्रीतून ‘महसूल’ गोळा करण्यात धन्यता मानत आहे. हाच उपद्व्याप उलटपक्षी आरटीओच्याच नियमांना तिलांजली देण्यासाठी पूरक ठरतो आहे. दुसरीकडे केवळ दंड करण्याऐवजी वाहतूक नियमांचे पालन करण्याची शिस्त लावण्याचा उद्देश असून रस्ता सुरक्षा आणि ट्रॅफिक व्यवस्थापनासंदर्भात सूचना, अभिप्राय, मार्गदर्शन किंवा तक्रारी पाठवाव्यात, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.
पंधरा दिवसांत साडेतीन हजार चलान
शहर पोलिसांनी १ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत एकूण ३ हजार ६४४ चलन प्रकरणे नोंदविली असून त्यातून सुमारे पंचवीस लाख १८ हजारांच्या रकमेचे चलन संबंधित चालकांना पाठविण्यात आले आहे. या कारवाईत रिक्षा चालकांवर युनिफॉर्म, बेंच अनिवार्य असून ‘ट्रिपल सीट रायडिंग, राँग साईड ड्रायव्हिंग, सिग्नल जम्प, ब्लॅक काचेच्या वापराबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. उच्च सुरक्षायुक्त नोंदणी पाठ्या (एचएसआरपी) बंधनकारक असल्याने आप्पा, दादा, भाऊ, नाना असे नंबर प्लेटवरील शब्द ‘नक्की हद्दपार होतील, का असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
त्याने बदलली नंबरप्लेट
‘हसवायचं म्हणून स्टंट केला आणि त्यानंतर पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ तरुणांबर आली. चौकडीने दुचाकीवर केलेल्या धोकादायक स्टंटचा व्हिडिओ एका तरुणाने मनोरंजन म्हणून इंस्टाग्रामवर पाठवला. ट्रॅफिक शाखेकडून त्वरित कारवाई करण्यात आली. या युवकांना क्राईम ब्रैंचकडेही चौकशीसाठी पाठविण्यात आले. तर, एका ‘एक्स यूजरने नाशिक शहर पोलिसांना ‘दादा’ नावाच्या नंबरप्लेटचा फोटो शेअर केला, तेव्हा वाहतूक पोलिसांनी हा कारमालक धुंडाळून काढला. मात्र, तत्पूर्वीच त्याने ही नंबरप्लेट काढून ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविल्याचे आढळले.





