Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Crime : अवैध कत्तलखान्यावर छापा; सात जण ताब्यात

Nashik Crime : अवैध कत्तलखान्यावर छापा; सात जण ताब्यात

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

येथील राजीव नगर झोपडपट्टी परिसरात अवैधरित्या गाईंची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोरक्षक दल, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांनी छापा टाकत हा अवैध कत्तलखाना उघडकीस आणला. या कारवाईत सुमारे ५०० ते ६०० किलो गोमास, तीन दुचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण १ लाख ५१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून इंदिरानगर पोलिसांच्या (Indiranagar Police) ताब्यात देण्यात आला.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके (Mayor Himgauri Aher-Adke) यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी पोलीस व प्रशासनाला पंचनामा करून अतिक्रमण असलेला कत्तलखाना तत्काळ जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही वेळातच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने दोन ठिकाणी असलेले कत्तलखाने पाडले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा कत्तलखाना अनेक दिवसांपासून सुरू होता. पुढील बाजूस चिकन व मटन सेंटर तर मागील बाजूस कत्तलखाना चालवून अतिशय छुप्या पद्धतीने गोमांस विक्री केली जात होती. नागरिकांच्या किंवा पोलिसांच्या (Police) निदर्शनास हा प्रकार न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईदरम्यान गोरक्षा दलाचे पुरुषोत्तम आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनपा गटनेते ॲड. शाम बडोदे, नगरसेवक अजिंक्य साने, नगरसेविका सुप्रिया खोडे, डॉ. दिपाली कुलकर्णी, नगरसेवक भगवान दोंदे, बाळकृष्ण शिरसाठ, विनायक गीत आदी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात कत्तलखाना चालवणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कत्तलखान्याचा मुख्य चालक फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. एपीआय सुनील अंकोलीकर, पोलीस उपनिरीक्षक साळी तसेच हवालदार कुलदीप पवार, सौरव माळी, सागर कोळी, नंदू हरपळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाणे करत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ जुलै २०२६ – दडपशाहीने प्रश्न कसे सुटतील?

0
लोकशाहीत लोकभावना आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या प्रश्नांकडे डोळेझाक करून चालत नाही, हा इतिहास आहे. नीट पेपर फुटीप्रकरणामुळे आज देशभरातील लाखो तरुण आणि त्यांचे पालक...