ओझे | Oze
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिंडोरी शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये (Taluka) अन्न सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान हॉटेल व्यावसायिक, किराणा व्यावसायिक आणि इतर छोट्या विक्रेत्यांनी तातडीने अन्न सुरक्षेचा परवाना (FSSAI License) काढून घ्यावा, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
व्यवसाय (Business) करताना आस्थापनांमध्ये सर्वोच्च दर्जाची स्वच्छता राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे व्यावसायिक स्वच्छतेचे नियम पाळणार नाहीत किंवा परवान्याशिवाय व्यवसाय चालवतील, त्यांच्यावर कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
शाळा परिसरात ‘जंक फूड’ विक्रीस बंदी
विद्यार्थ्यांच्या (Student) आरोग्याचे रक्षण करण्यासाठी शालेय परिसराच्या ५० मीटर अंतराच्या आत जंक फूड आणि असुरक्षित अन्नपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाची कडक नजर असणार आहे.
मातेरेवाडीत पहिली धडक कारवाई
या मोहीम आणि नियमावलीअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील (Didori Taluka) मातेरेवाडी येथील मविप्रच्या नूतन इंग्लिश स्कूल जवळील ‘ओम साई जनरल स्टोअर्स’ या दुकानावर पहिली धडक कारवाई करण्यात आली. नियम धाब्यावर बसवून विक्री करणाऱ्या या दुकानदाराला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या स्टोअर्सचे संचालक विकास वाघ यांनी ऑनलाइन दंड भरला.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
या कारवाईमुळे तालुक्यातील नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांचे मोठे धाबे दणाणले असून, प्रशासनाने सर्व आस्थापनांना नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक भड व चेतन परदेशी यांनी केले आहे.




