ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीच्या तयारीत गुंतला असतानाच, बाजारात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आणि शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या ‘फुले संगम’ या सोयाबीन (Soybean) बियाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बियाणे मिळेनासे झाल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला असून, अनेक भागांतील पेरण्या खोळंबल्या आहेत.
हुकमी उत्पादनामुळे ‘फुले संगम’लाच पसंती
गेल्या काही वर्षांत ‘फुले संगम’ या वाणाने कमी पाऊस आणि रोगराईतही दर्जेदार व हुकमी उत्पादन दिल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा या बियाण्यावर प्रचंड विश्वास वाढला आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी तालुक्यातील जवळपास ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांनी याच वाणाची निवड केली आहे. मात्र, कृषी सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवूनही हे बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पाऊस चांगला झाला आहे, जमीनही पेरणीयोग्य झालीय. पण चार दिवसांपासून कृषी सेवा केंद्रात चकरा मारतोय, कुठेही ‘फुले संगम’ बियाणे मिळेना. दुसरी कंपनी घ्यायची भीती वाटते. शासनाने तातडीने पुरवठा करावा, अन्यथा आमचे मोठे नुकसान होईल आशी चर्चा शेतकरी वर्गात होताना दिसत आहे.
कृषी विभागाचे नियोजन कोलमडले?
दरवर्षी कोणत्या बियाण्याची मागणी अधिक राहू शकते, याचा अंदाज घेऊन कृषी विभागाने बियाण्यांचा बफर स्टॉक उपलब्ध करून देणे गरजेचे असते. मात्र, यंदा नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. काही खाजगी व्यापाऱ्यांकडून या टंचाईचा गैरफायदा घेत बियाण्यांची साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री (ब्लॅक मार्केटिंग) केली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. सोयाबीनच्या पेरण्या वेळेत होणे गरजेचे असते. पेरणीला फार उशीर झाल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. आधीच खते आणि इतर मशागतीचा खर्च वाढलेला असताना, आता बियाण्या अभावी पेरणी लांबणीवर पडल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून महाबीज व इतर अधिकृत कंपन्यांकडून ‘फुले संगम’चा साठा उपलब्ध करून द्यावा आशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.




