ओझे l विलास ढाकणे | Oze
नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) संपूर्ण ग्रामीण भागातील कृषी फिडरवर गेल्या तीन दिवसांपासून रात्रीचे तीव्र भारनियमन केले जात आहे. यामुळे वाडी-वस्ती आणि मळ्यांमध्ये राहणाऱ्या जनतेमध्ये महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या संपूर्ण कृषी फिडरवर रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने, शेतातील वस्त्यांवर बिबट्यांचा (Lepord) वावर वाढला आहे. ग्रामीण भागात सध्या ‘चोरांपेक्षा बिबट्यांची दहशत’ अधिक निर्माण झाली असून, महावितरणने हा रात्रीच्या भारनियमनाचा जीवघेणा खेळ त्वरित थांबवावा, अशी संतप्त मागणी जनतेकडून होत आहे.
फक्त ‘बळीराजा’लाच सावत्र वागणूक का?
विशेष बाब म्हणजे, हे भारनियमन केवळ आणि केवळ कृषी फिडरवरच लादले जात आहे. औद्योगिक वसाहती (Industrial Zone) तसेच ज्या ठिकाणी स्वतंत्र ‘गावठाण फिडर’ उपलब्ध आहेत, तिथे वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. ”ज्याला जगाचा पोशिंदा म्हणून विविध विशेषणे लावून कौतुक केले जाते, त्याच बळीराजाला शासन आणि महावितरण कंपनीकडून कायम सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्यामुळे पिकांना अतिरिक्त पाणी देण्याची कोणतीही गरज नाही. परिणामी, जिल्ह्यातील ७० ते ८० टक्के सबस्टेशनवर विजेचा लोड अत्यंत कमी (अल्प) आहे. लोड नसतानाही भर पावसाळ्यात हे भारनियमन का केले जात आहे? असा सवाल करत शेतकरी वर्गाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
बिबट्यांचा धुमाकूळ; निष्पापांचे बळी
दिंडोरी तालुक्यात बिबट्यांचा कायमच दिवसाढवळ्या धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. हे हिंस्त्र बिबटे सायंकाळी ६ वाजेपासूनच मुख्य रस्त्यांवर आणि वस्त्यांवर उघडपणे वावरताना दिसतात. तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांनी दिवसा माणसांवर हल्ले केले असून, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अनेक लहान मुलांचे बळीही घेतले आहेत. ज्या परिसरामध्ये बिबट्यांचा अधिक संख्या आहे त्या ठिकाणी भारनियमन नको आहे या सर्व परिस्थितीची गंभीर महावितरण कंपनीला माहिती असताना सुद्धा यांचे गांभीर्य नसावे, याबद्दल नवल व्यक्त केले जात आहे.
ऊर्जामंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे
गेल्या तीन दिवसांपासून केवळ नाशिक जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या संपूर्ण ग्रामीण भागातील कृषी फीडरवर रात्रीचे भारनियमन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे रात्रीचे जीवघेणे भारनियमन तातडीने बंद व्हावे. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. बिबट्या प्रवण क्षेत्रात अखंडित वीज मिळावी.
राज्याचे ऊर्जामंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घ्यावी आणि जगाच्या पोशिंद्याला न्याय द्यावा, अशी आर्त हाक आज नाशिक जिल्ह्यातील गावागावातून दिली जात आहे. आता तरी महावितरण यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




