नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सायबर चाेरट्यांनी (Cyber Theives) आता डिजिटल अरेस्ट आणि गंभीर गुन्ह्यांची भीती दाखवून नागरिकांची (Citizen) आयुष्यभराची पुंजी लुटण्याचा भयंकर मार्ग शोधला आहे. दिल्लीतून बँक खात्याचा गैरवापर, सहा कोटी ८० लाख रुपयांचे मनी लाँड्रिंग, ड्रग्ज स्मगलिंग आणि मानवी तस्करीसारख्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांमध्ये (Criminal) नाव आल्याची भीती दाखवून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६३ वर्षीय सेवानिवृत्त महिलेस तब्बल १५ लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे.
सायबर चाेरट्यांनी तक्रारदाराशी पाेलीस, सीबीआय व एटीएसमधून बाेलत असल्याचे भासवून संपर्क साधत तुमच्या नावावर दिल्लीत (Delhi) सीम कार्ड काढून बँक खाते उघडण्यात आले आहे. या खात्यावर ६.८० कोटींचा काळा पैसा, ड्रग्ज स्मगलिंग आणि मानवी तस्करीची रक्कम जमा झाली असून तुमच्यावर केस दाखल झाली आहे, अशी बतावणी केली. चौकशीच्या नावाखाली तक्रारदाराच्या सर्व संपत्तीची माहिती मिळविली. पोलिसांची (Police) भीती दाखवून भामट्यांनी तक्रारदाराला त्यांच्या बँक ठेवी मोडण्यास आणि अंगावरील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्यास भाग पाडले.
दागिने गहाण ठेवून व ठेवी मोडून आलेली १५ लाख रुपयांची रक्कम आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) एका विशिष्ट खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले. चौकशी पूर्ण झाल्यावर आणि तुमचे नाव निर्दोष सुटल्यावर हे सर्व पैसे पुन्हा तुमच्या मूळ बँक खात्यात जमा केले जातील, असे आश्वासन चाेरट्यांनी दिले. मात्र, पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.
ही घटना ११ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडली असून, ११ सप्टेंबर २०२६ रोजी उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. अज्ञातांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमासह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमान्वये फसवणूक व खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारूती पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे तपास करत आहेत. सध्या पंधरा लाखांची रक्क्म काही तासांत ८०० हून अधिक वेगवेगळ्या मल्टिप्लाय खात्यातून वळती झाली असून सायबर पाेर्टलकडेही तक्रार नाेंद झाली आहे. त्यातून काही रक्क्कम गाेठविण्यात यश येण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- – कोणताही पोलीस अधिकारी किंवा सरकारी तपास यंत्रणा व्हॉट्सॲप व्हॉईस/व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करत नाही किंवा पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत नाही.
- फोनवर कोणालाही आपल्या ठेवी, बँक खात्याची माहिती किंवा मालमत्तेचा तपशील देऊ नका.
- असा कोणताही फोन आल्यास न घाबरता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधा.




