नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यातील विविध महापालिकांसह नाशिक व मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी (Nashik and Malegaon Municipal Corporation Election) अवघे सात दिवस शिल्लक असताना पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने मैदानात उतरली आहे. मतदान निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या व सर्वप्रकारच्या रजा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान पूर्ण होईपर्यंत सलग ‘ऑन ड्युटी’ राहावे लागणार आहे.
नाशिक व मालेगाव महापालिका मतदानासाठीचा (Voting) बंदोबस्त आराखडा अंतिम टप्यात असून संवेदनशील मतदान केंद्रे, प्रमुख चौक, प्रचारसभा स्थळे इत्यादी आघाड्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात अतिरिक्त पोलिसांची कुमक सोमवार (दि.१२) पर्यंत दाखल होणार असून, त्यानंतर क्षेत्रनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या किरकोळ रजा, साप्ताहिक सुट्या तसेच अन्य रजा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आल्या आहेत. केवळ अतिमहत्त्वाच्या वैद्यकीय कारणास्तवच रजा मंजूर केली जाणार असून त्यासाठी वैध वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
नाशिक, मालेगावसह जळगाव, धुळे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर शहर, मीरा-भाईंदर-वसई विरार, अकोला, परभणी, नदिड, चंद्रपूर, कोल्हापूर व बुलढाणा या महापालिका क्षेत्रातही पोलीस सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच प्रमुख राजकीय नेत्यांचे दौरे सुरू असल्याने सभा, रोडशो व प्रचार कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या असून, विशेष शाखा व स्थानिक गुप्तचर यंत्रणेला अधिक सक्रिय करण्यात आले आहे.
बंदोबस्ताचे नियोजन
- १४ ते १६ जानेवारीदरम्यान किरकोळ रजा व साप्ताहिक सुट्या बंद
- पोलीस आयुक्त व परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांना स्पष्ट सूचना
- बंदोबस्त १६ जानेवारीच्या रात्रीपर्यंत कार्यरत
- १७ जानेवारी रोजी गरजेनुसार दुपारनंतर बंदोबस्ताची माधार
- विशेष शाखेमार्फत अतिरिक्त बंदोबस्त व माहिती संकलन




