नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) १२२ सदस्यांच्या सभागृहात २०२६ च्या निवडणुकीनंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपने (BJP) ७२ जागा जिंकत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने २६ तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षांना वगळता उर्वरित पक्षांनी मिळून २० जागा मिळवल्याने विरोधी गटाचे अस्तित्व कायम राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आता स्वीकृत नगरसेवक (नॉमिनेटेड सदस्य) कोणाला आणि किती मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर
निवडणूक निकालानुसार उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला (उबाठा) १५ जागा मिळाल्या असून तो मुख्य विरोधी पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसला (Congress) केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. मनसेला एकच जागा मिळाली असून, एका अपक्ष उमेदवारानेही विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप, शिंदे गट व अजित पवार गट वगळता इतरांची एकूण संख्या २० इतकी आहे. २०१७ च्या निवडणुकीशी तुलना केली तर चित्र वेगळे दिसते. त्यावेळी भाजपकडे ६६ तर अविभाजित शिवसेनेकडे ३२ जागा होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी सहा जागांवर होत्या, मनसेकडे पाच जागा होत्या, तर आठहून अधिक अपक्ष व छोटे पक्ष निवडून आले होते. म्हणजेच २०१७ मध्ये भाजप-शिवसेना वगळता सुमारे २६ नगरसेवक होते; २०२६ मध्ये हा आकडा २० वर घसरला आहे. यावरून शहरात मोठ्या पक्षांचे वर्चस्व वाढल्याचे दिसते.
हे देखील वाचा : नात्यागोत्यांच्या ‘मेळ्या’त मतदारांची डझनभरांना नापसंती; कोण ठरलं अपयशी?
महापालिका अधिनियमानुसार मनपात यंदा सुमारे पाच स्वीकृत नगरसेवक (Corporators) नियुक्त होणार आहे. यामध्ये कला, साहित्य, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची निवड केली जाते. परंपरेनुसार या जागांचे वाटप सभागृहातील पक्षबलानुसार केले जाते. त्यामुळे सर्वाधिक स्वीकृत सदस्य भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याखालोखाल शिंदेंच्या सेनेला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : निवडणुकीतील पराभवानंतर वसूलीसाठी राडा; शिंदे सेनेच्या पदाधिकार्यासह साथीदारांवर दरोडा, खंडणीचे गुन्हे
स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय?
स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेतून होत नाही. शहरातील अनुभवी, कार्यकुशल आणि विविध क्षेत्रात (प्रशासन, कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक सेवा इ.) योगदान देणार्या व्यक्तींना ही संधी दिली जाते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश असतो.
हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळताच भाजप शहराध्यक्षांनी शिंदे सेनेला डिवचलं; म्हणाले, “आता त्यांनी विरोधी…”
नियुक्तीची प्रक्रिया कशी आणि अधिकार कोणते?
महापालिका आयुक्तांच्या शिफारशीवरून आणि सभागृहाच्या संमतीने स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होते.त्यानंतर महापौरांच्या शिफारशीनंतर अंतिम नियुक्ती राज्य सरकारकडून केली जाते. निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच स्वीकृत सदस्यांनाही मानधन, भत्ते आणि विकास निधी मिळतो. ते सभागृहातील चर्चेत सहभागी होऊ शकतात, विविध विषयांवर सूचना मांडू शकतात. तसेच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक यांसारख्या समित्यांमध्ये कार्य करू शकतात. मात्र, महापालिकेच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये (महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आदी) त्यांना मतदानाचा (Voting) अधिकार नसतो.





