बोरगाव | वार्ताहर | Borgaon
सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) साधारणपणे १,७६१ सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहे. सुरगाणा तालुक्यात विजेच्या प्रश्नाने गेल्या अनेक वर्षापासून गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. तालुक्यात व्यावसायिक शेती (Farm) कमी प्रमाणात असल्यामुळे विजेचा खप त्यामानाने कमी होतो. मात्र, लोकांनी घरगुती वीज मिळवण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याने वीज मंडळाची पाहिजे तशी वसुली होत नाही. यामुळे तालुक्यात जर वीज पुरवठ्यात काही व्यत्यय आला तर वीज मंडळाचे (Electricity Board) कर्मचारी अडचण दुरुस्त करण्यामध्ये टाळाटाळ करण्याचे प्रकार घडतात.
यावर उपाय म्हणून नागरिकांचा आता सोलर एनर्जीकडे ओढा वाढलेला दिसतो. फक्त सुरगाणा तालुक्याचा विचार जरी केला तरी महाऊर्जा या शासनाचा उपक्रमावर माध्यमातून १,२११ शेतकऱ्यांनी सोलर वीजपंप बसवलेले आहेत. यासह महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनही ५५० सोलर वीजपंप असे एकूण १७६१ सौर कृषीपंप (Agricultural pump) बसवण्यात आले.
आदिवासी शेतकऱ्यांना (Tribal Farmers) सोलर कृषी पंप घेण्यासाठी फक्त टक्के रक्कम भरावी लागते. यासाठी ३ अश्वशक्तीचा पंप घेण्यासाठी ११,५०० रुपये, ५ अश्वशक्तीचा कृषी पंप घेण्यासाठी १६,०३८ रुपये, साडे सात अश्वशक्तीचा कृषी पंप घेण्यासाठी २२,५०० रुपये भरावे लागतात. उर्वरित ९५ टक्के रक्कम ही अनुदान रुपात शेतकऱ्यांना मिळत असल्याने मोठा फायदा होतो. शिवाय राज्य महावितरण कंपनीच्या पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणीपासूनही सुटका होते. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा ओढा सोलर कृषीपंपाकडे वाढल्याचे दिसत आहे. सरकारच्या महाऊर्जा या उपक्रमामार्फत नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ११२६५ सौर कृषी पंप बसवून देण्यात आले आहे. त्यात सर्वात जास्त फायदा येवला तालुक्याने घेतलेला आहे.
डिसेंबर महिन्यात निफाड दिंडोरीमध्ये द्राक्षबागेच्या कामावर गेलो होतो. डोंगराच्या कडेला ३६ एकर जमीन आहे. विहीर खोदली असता १० फुटावरच पाणी लागले. महाऊर्जाच्या सहकार्यातून सौर पंप बसविल्याने मला आता नगदी पिके घेता येणार असल्याने आनंद वाटतो.
हिरामण गायकवाड, वांगणसुळे, ता. सुरगाणा