Sunday, November 22, 2026
HomeनाशिकNashik News : हरवलेला संवाद अन् २०० मुलींचे पलायन; जिल्हा महिला व...

Nashik News : हरवलेला संवाद अन् २०० मुलींचे पलायन; जिल्हा महिला व बालविकास विभागाची आकडेवारी

परराज्यातूनही मुलींचे पलायन

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सोशल मीडियावरील (Social Media) अनोळखी ओळखी, इन्स्टाग्रामवरील संपर्क आणि प्रेमसंबंधांतून अल्पवयीन मुली घर सोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या नोंदीतून समोर आले आहे. मागील वर्षभरात चाईल्डलाईन (१०९८) व पोलिसांच्या माध्यमातून नाशिकमध्ये सुमारे २०० मुलींची (Girl) नोंद झाली असून, त्यातील बहुतांश १४ ते १६ या संवेदनशील वयोगटातील आहेत. मागील महिन्यातच पोलिसांमार्फत रेस्क्यू होऊन १४ ते १५ मुली बालगृहात दाखल झाल्या.

- Advertisement -

​जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतूनही इन्स्टाग्रामवरील ओळखीवरून मुली मुंबई किंवा अन्य ठिकाणी निघाल्याचे प्रकार उघड झाले आहेत. रेल्वे पोलीस किंवा चाईल्ड हेल्पलाइन १०९८ च्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर रेल्वे व बस स्थानकांवरून अशा मुलींना रेस्क्यू केले जाते.१०९८ किंवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर बाल कल्याण समितीच्या आदेशाने मुलींना बालगृहात दाखल केले जाते.

वैयक्तिक माहितीच्या आधारे पालकांशी संपर्क (Contact) साधून त्यांना घटनेची माहिती दिली जाते आणि पालक आल्यानंतर समितीच्या आदेशानुसार मुलींना त्यांच्या ताब्यात दिले जाते. या प्रक्रियेत बालगृह, १०९८ आणि वन स्टॉप सेंटरमधील समुपदेशकांच्या माध्यमातून मुलींचे समुपदेशन केले जाते. मात्र, समुपदेशनादरम्यान अनेक मुलींवर अनोळखी ओळखीचा इतका पगडा असतो की, त्या पालकांकडे परत जाण्याऐवजी ओळख झालेल्या व्यक्तीकडेच जाण्याचा आग्रह धरतात.

​संध्याकाळी सहा ते आठचा बदललेला नूर

या परिस्थितीत घरातील संवादाचा अभाव हा प्रमुख मुद्दा समोर आला आहे. पूर्वी शाळेतून आणि कामावरून घरी आल्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मुले खेळणे किंवा कुटुंबासोबत बसून दिवसभरातील घडामोडी व शाळेतील अनुभव शेअर करत हाेते. आता मात्र या वेळेत मुले ट्युशन किंवा मोबाईलमध्ये, तर कामावरून थकून आलेले पालक टीव्ही किंवा सोशल मीडियामध्ये गुंतून पडतात. एका ग्रामपंचायतीने ‘संध्याकाळी ६ ते ८ मोबाईल आणि टीव्ही बंद’ असे अभियान राबवल्याचे सकारात्मक उदाहरणही या निमित्ताने पुढे आले आहे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधणे, गरज भासल्यास १०९८, वन स्टॉप सेंटर किंवा समुपदेशकांची मदत घेणे गरजेचे आहे.

आकडेवारी

चालू वर्षात(२०२६) चाईल्डलाईन आणि पोलिसांच्या माध्यमातून नाशिकमध्ये २०० मुलींची नोंद.
बहुतांश मुली १४ ते १६ वयोगटातील
मागील महिन्यात रेस्क्यू करुन दाखल मुलींची संख्या १४ ते १५
उत्तर प्रदेश व बिहार येथूनही इन्स्टाग्रामवरील ओळख
मुली मुंबईकडे रवाना झाल्याचे प्रकार
रेल्वे पोलीस व १०९८ च्या माध्यमातून उघड
अनेक मुली ओळख झालेल्या व्यक्तीकडेच जाण्याचा आग्रह धरतात

ताज्या बातम्या

राज्य नाट्य स्पर्धा : स्त्री-पुरूष समानतेची गरज अधोरेखित करणारं ‘इक्विलिब्रिअम’

0
- संदीप जाधव पुरूषप्रधान समाजात हजारो वर्षांपासून स्त्रियांनी अतोनात अत्याचार सहन केला. स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जायची. मात्र, आजच्या बदलत्या काळात आता स्त्रियांकडूनच पुरूषांवर अत्याचार...