Friday, October 9, 2026
HomeनाशिकNashik Pothole News : कामासाठी खोदलेला खड्डा ठरला जीवघेणा! ६१ वर्षीय नागरिकाचा...

Nashik Pothole News : कामासाठी खोदलेला खड्डा ठरला जीवघेणा! ६१ वर्षीय नागरिकाचा दुचाकीसह खड्ड्यात पडून मृत्यू

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) पार्श्वभूमीवर शहरभर सुरू असलेल्या विविध विकासकामांसाठी रस्ते खोदले जात असताना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या मधोमध खोदून ठेवलेल्या खड्ड्याभोवती सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसल्याने इंदिरानगर परिसरात एका ६१ वर्षीय निवृत्त नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. या घटनेमुळे महापालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीवर संतप्त सवाल उपस्थित होत आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश किसनराव वानदेशकर (६१, रा. हेरंब सोसायटी, श्रद्धा विहार, इंदिरानगर) असे मृत नागरिकाचे नाव आहे. वानदेशकर हे बुधवार (दि.०७) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास (एमएच १५ एफ एस ४७२४) या दुचाकीवरून कलानगरकडून राजीव नगरच्या दिशेने जात होते. राजीव नगर वसाहतीजवळ रस्त्याच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. रात्रीच्या अंधारात हा खड्डा स्पष्ट दिसत नाही त्याठिकाणी सूचना फलक अथवा पुरेशी प्रकाशयोजना करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वानदेशकर यांची दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली.

या भीषण अपघातात (Accident) त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना खड्ड्यातून बाहेर काढून खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

माजी महापौरांनी केली पाहणी

माजी महापौर दशरथ पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिकाचा बळी गेल्याचे सांगत, अर्धवट आणि असुरक्षित कामांमुळे शहरात आतापर्यंत १३ जणांचा बळी गेल्याचा दावा त्यांनी केला. आणखी किती नागरिकांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिका प्रशासनाकडून कंत्राटदारांना नोटिसा बजावल्याचे आणि सोशल मीडियावर कारवाईचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष रस्त्यांवरील परिस्थिती वेगळीच असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे योग्य चौकशी होऊन कारवाई करण्यात येण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

नागरिकांमध्ये तीव्र संताप

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “रस्ता खोदायचा, काम अर्धवट ठेवायचे आणि नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घ्यायची नाही, तर जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित केला जात आहे. रस्ते खोदल्यानंतर संबंधित ठिकाणी बॅरिकेटिंग, सूचना फलक, रिफ्लेक्टर, पुरेशी प्रकाशयोजना आणि सुरक्षारक्षक तैनात करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटना घडून गेल्यानंतर या ठिकाणी नंतर बॅरिकेट लावण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. सिंहस्थाच्या कामांसाठी रस्ते खोदताना विकास कामांपेक्षा नागरिकांची सुरक्षा प्रथम असणे अपेक्षित आहे. मात्र, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव जीवघेणा ठरत असल्याने ‘काम पूर्ण करण्याची घाई की नागरिकांच्या जीवाची किंमत?’ हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यातील २५ हेक्टर राखीव जंगलावर तस्करांची पुन्हा कुऱ्हाड; दररोज ४ ते...

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) श्रीगोंदा शहरापासून अवघ्या ५ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या अधळगाव रस्त्यालगतच्या सुमारे २५ हेक्टर राखीव वनक्षेत्रात झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू असल्याचे समोर आले...