
नाशिक | Nashik
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती (Farmer Debt Relief) योजना २०२६ मध्ये दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) एकूण ९ हजार ७३१ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी ५१ लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद, समितीचे सदस्य- सचिव तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नाशिक कुंदन भोळे यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील एकूण २० हजार ३४१ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात १७३ कोटी ६९ लाख ९३ हजार २८७ रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली होती. यापैकी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२ हजार ३११ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ८६ कोटी ७२ लाख ६५ हजार ५२८ रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली, तर व्यापारी बँकेच्या ८ हजार ३० पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ८६ कोटी ९७ लाख २७ हजार ७५९ रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली.
या योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात २४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील एकूण ९ हजार ७३१ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी ५१ लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यापैकी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Cooperative Bank) ४ हजार ८५६ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ३४ कोटी ९२ लाख रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली, तर व्यापारी बँकेच्या ४ हजार ८७५ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ४५ कोटी ५७ लाख रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३० हजार ७२ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण २६० कोटी २१ लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील पहिल्या यादीतील (First List) ३५ हजार ६४२ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ३१ हजार ९५६ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले असून ३ हजार ८८६ लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर आधार क्रमांक, कर्जखाते, कर्ज रक्कम आदींबाबत तक्रार नोंदविलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांबाबत संबंधित बँकेकडून कागदपत्रे प्राप्त करून घेऊन ऑनलाईन पद्धतीने तक्रार निवारणाचे कामकाज जिल्हास्तरीय समितीस्तरावर सुरू आहे.
ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी तत्काळ जवळच्या आपले सरकार केंद्राला किंवा ई सेवा केंद्राला भेट देऊन विनामूल्य आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी व ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करताना त्यांच्या आधार, कर्ज रक्कम व बँक कर्ज खाते क्रमांकाबाबत तक्रार नोंदवली आहे, त्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेच्या शाखेशी किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन उपनिबंधक, सहकारी संस्था भोळे यांनी केले आहे.




