मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
मालेगाव, नांदगावसह जळगाव जिल्ह्याला वरदान असलेले गिरणा धरण (Girna Dam) ९० टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे. १८,५०० द.ल.घ.फूट क्षमतेच्या या धरणात शनिवारी सकाळी १६,६५६ द.ल.घ.फूट पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे मालेगाव, नांदगाव तसेच चाळीसगाव व परिसरातील पाणी योजनांचा पाणीप्रश्न (Water Issue) निकालात निघाला आहे.
गिरणा धरणातून नियमित सोडण्यात येणाऱ्या आवर्तनामुळे मालेगावसह चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव या भागातील शेती सिंचनाचाही प्रश्न मिटला असल्याने शेतकरीवर्गात (Farmer) समाधान व्यक्त होत आहे. पावसाचे सातत्य असेच कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने लवकरच भरेल, असे चित्र दिसत आहे. गिरणा नदी उगम क्षेत्रात तसेच चणकापूर धरण क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून पावसाचे सातत्य कायम असल्याने गिरणा नदी महिनाभरापासून दुबडी भरून वाहत आहे.
गिरणेच्या उपनद्यांनाही पूरपाणी आल्याने गिरणा धरणातील जलसाठा (Water Storage) आठवडाभरापासून झपाट्याने वाढत आहे. मोसम नदीवरील हरणबारी धरण जून महिन्यातच शंभर टक्के भरल्याने धरणातील अतिरिक्त पाणी मोसम नदीद्वारे गिरणा नदीत सोडण्यात येत आहे. तसेच पुनद धरणाच्या परिसरातही बऱ्यापैकी पाऊस असल्याने या धरणातील विसर्गही गिरणेत येऊन मिळतो. परिणामी गिरणा धरणाचा जलसाठा वाढण्यास यामुळेही फायदा झाला आहे. गिरणा धरणावर मालेगाव शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना, नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच माळमाथा पाणीपुरवठा योजना यांचे भवितव्य अवलंबून आहे.
गेल्या काही वर्षांपासून गिरणा धरण सलग शंभर टक्के भरत असल्याने या भागातील पाणीटंचाई (Water Shortage) काहीशी संपुष्टात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह अनेक पाणीपुरवठा योजनांना गिरणा जलसाठ्यातून पाणी दिले जाते. या भागातही आता पुरेसे पाणी मिळणार असल्याने तेथील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. गिरणा धरण शंभर टक्के भरले असले तरी तालुक्यातील तीन लघुबंधा-यांत मात्र अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. तालुक्यात झाडी, दहिकुटे, साकूर, लुल्ले, अजंग, बोरी,आंबेदरी व दुधे या ठिकाणी लघुप्रकल्प आहेत. या सातही प्रकल्पांची एकूण जलसाठा क्षमता ५२८.३१ द.ल.घ.फूट आहे.
पाटबंधारे खात्याकडील आकडेवारीनुसार, दहिकुटे धरणात १०२.३८, साकूर ५१, लुल्ले ८८.३. बोरीआंबेदी ९९.६९ जलसाठा आहे. दहिकुटे, साकूर, बोरीआंबेदी धरणात शंभर टक्के जलसाठा जमा झाला आहे. याउलट झाडी, अजंग व दुधे बंधाऱ्यात अद्यापही पुरेसा जलसाठा नाही. उर्वरित पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास हे लघुप्रकल्प भरण्याची शक्यता आहे. अन्यथा या जलसाठ्चावर अवलंबून असणाऱ्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




