नाशिक | प्रतिनिधी | Nashik
प्रेमविवाहानंतर (Love Marriage) पतीची करोना (Corona) महामारीमुळे आर्थिक स्थिती ढासळली. त्यामुळे पत्नीच्या (Wife) हौस व मौजमजेला थेट ‘ब्रेक’ लागल्याने तिने पतीकडे पैशांची मागणी करुन त्याचा छळ सुरु केला. प्रेमविवाह करुनही पत्नीकडून सुरु असलेल्या या छळाला कंटाळून अखेर पतीने गोदावरी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेचा उलगडा अखेर झाला असून न्यायालयाच्या आदेशाने संशयित पत्नीवर पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पंचवटी पोलिसांत (Panchavati Police) दाखल करण्यात आला आहे.
भारती प्रीतम गवादे (वय ३२, रा. इंदिरानगर) असे संशयित पत्नीचे नाव असून तिच्या जाचास व मागण्यांना कंटाळून पती प्रीतम मनोहर गवादे (वय ३६, रा. पाथर्डी फाटा) याने १२ ऑगस्ट २०२४ रोजी आत्महत्या (Suicide) केली होती. त्याची ओळख सन २०१९ नंतर इंदिरानगर भागात राहणाऱ्या भारती हिच्याशी झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाह केल्यावर दोघे पाथर्डी फाटा येथे तात्पुरते सेट होऊन संसार फुलवू लागले.
दरम्यान, अचानक लॉकडाऊन लागल्याने प्रीतमचे सुरु असलेले काम थांबले. नोकरी व व्यवसाय ठप्प झाल्याने तो आर्थिक विवंचनेत सापडला. त्यामुळे त्याला संसार चालविणे कठीण झाले. तो कमविण्यासाठी प्रयत्न करत असतानाच, भारती हिने त्याला हिणवणे सुरु केले. त्यामुळे दोघांतील वितुष्ट वाढत गेले. त्यामुळे प्रीतम हा एकाकी पडला. यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
‘तुझ्याशी प्रेम करुन फसले’
प्रीतम व त्याच्या पत्नीने एकमेकांसोबत आयुष्य घालविण्याचे कबुल केले होते. मात्र, आर्थिक चणचण सुरु होताच तिने पावित्रा बदलत ‘तू भिकारी आहेस, मला घटस्फोट दे, माझी काहीच मौज मजा होत नाही. तू तुझ्या वडिलांकडून १० लाख रुपये घेऊन ये’, असे म्हणूण त्याला धमकी दिली. प्रीतमने दहा लाख रुपये आणण्यास नकार दिला असता, तिने वेळोवेळी भांडण केले. याचदरम्यान, तिने प्रीतमला अंधारात ठेवत गैरवर्तनाबद्दल बरेच काही लपवून ठेवले. याच छळाला कंटाळून त्याने सुसाईड केल्याचे प्रीतमच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करत आहेत.
वडिलांचा पाठपुरावा
प्रीतमचे वडील मनोहर नथू गवांदे (वय ६०, रा. प्रतीक्षा ज्वेलर्ससमोर, उल्हासनगर, ठाणे) हे पोलीस दलातून सहायक उपनिरीक्षक पदावरुन निवृत्त झाले आहेत. प्रीतमने प्रेमविवाह केल्यानंतर काही महिन्यांनी तो बेपत्ता झाल्याचे कळताच त्यांनी शोधाशोध केली. तेव्हा त्यांना मुलाच्या छळाबाबत बऱ्याच गोष्टींची कल्पना होती. मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी त्याचा विधी आटोपून प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागून अर्ज केला. न्यायालयाने संशयित भारतीवर गुन्हा नोंदवून पंचवटी पोलिसांना सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.