
नाशिक | Nashik
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवार) नाशिकमध्ये अखिल भारतीय समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक (Meeting) पार पडली. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समता परिषदेच्या आगामी उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, ओबीसी आरक्षण आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
ओबीसींचे आरक्षण संपलेले नाही
यावेळी भुजबळ म्हणाले की , “ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) संपले आहे, हे विधान मला अजिबात मान्य नाही. जात पडताळणी प्रक्रियेत जिथे चुका होत आहेत, तिथे आपण कायदेशीर लढाई लढत आहोत. २०११ पासून जातनिहाय जनगणनेची (Census) आमची मागणी होती आणि त्यावर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. जेव्हा सरकार आपल्यासोबत आहे, तेव्हा आपण विरोधात काय बोलणार? असा सवाल त्यांनी केला.
जरांगेंचे आंदोलन सरकारच्या विरोधात
पुढे जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना भुजबळ म्हणाले, “जरांगे यांची लढाई ही थेट आमच्या विरोधात नसून ती सरकारविरोधात आहे. त्यामुळे यावर सरकारच योग्य तो निर्णय घेईल आणि मार्ग काढेल. ओबीसींमध्ये कोणत्या जातींचा (Cast) समावेश असावा यावरही सरकार निर्णय घेईल. तसेच, प्रत्येक राज्यात ओबीसी समाजाचा शोध घेण्याच्या त्यांच्या मागणीवर सरकार काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
गरज पडेल तेव्हा मंत्रिपदाचा त्याग करून लढलोय
आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देताना भुजबळ म्हणाले, “महाराष्ट्रात माळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. जेव्हा जेव्हा समाजावर किंवा आरक्षणावर संकट आले, तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मी राज्यभर फिरलो आहे. त्यामुळे छगन भुजबळ घाबरणारा माणूस नाही. गरज होती तेव्हा आपण मैदानात उतरून लढलो आहोत. पण आता सरकार आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याने आम्ही चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यावर भर देत आहोत”, असे त्यांनी सांगितले.
आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही
पुढे ते म्हणाले, “आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. तर वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम आहे.आज आरक्षण मिळाल्यामुळे समाजातील वंचित घटकातील मुले शिक्षित होऊन आज मोठ्या पदावर पोहचली आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह महापुरुषांचे विचार प्रत्येक जिल्ह्यात रुजविण्याचे काम समता सैनिकांनी करावे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह समाज सुधारकांना आपल्या कार्यकाळात काम करत असताना अनेक कर्मठ लोकांनी विरोध केला त्रास दिला. त्या पद्धतीचे काही लोक आजही समाजात अजून समाजविघातक काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या विघातक शक्तींना आपण हाणून पाडले पाहिजे”, असेही भुजबळ म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे मानले आभार
भुजबळ पुढे म्हणाले, समाजातील जे वंचित घटक आहे. जो अडलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मदतीचा हात देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्रत्येक समता सैनिकाने अविरतपणे केले पाहिजे. देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी सर्वात अगोदर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आवाज उठविला. आंदोलने, मोर्चे काढण्यात आले निवेदने देण्यात आली. तसेच समीर भुजबळ हे खासदार म्हणून संसदेत काम करत असताना त्यांनी देशातील ओबीसी खासदारांना एकत्र करून केंद्र सरकारकडे मागणी देखील केली. आज आपल्या या लढ्याला मोठ यश मिळाले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला कोण-कोण होते उपस्थित
यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, डॉ.कैलास कमोद, ईश्वर बाळबुधे,ॲड.राजेंद्र महाडोळे, प्रा. सत्संग मुंडे,ॲड. मंगेश ससाणे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, सदानंद मंडलिक, गुफरान शब्बीर अन्सारी, डॉ.नागेश गवळी, डॉ.स्नेहा सोनकाटे, प्रा. दिवाकर गमे, शंकरराव लिंगे ,सुनिल मेटे, प्मंजिरी धाडगे, माया इरतकर,प्रा. संतोष वीरकर, समाधान जेजुरकर, रविंद्र खरात,यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




