जुने नाशिक | प्रतिनिधी
पवित्र ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंतीचा मोठा सण शहर परिसरातील मुस्लिम बांधव आज शुक्रवारी साजरा करणार आहे. यानिमित्त जुने नाशिकसह शहरातील संपूर्ण मुस्लिम बहुल भागात सजावट करण्यात आली आहे.
हिरवे, लाल झेंडे तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले असून घरांमध्ये देखील फातेहा पठण करण्यात आली आहे. दरम्यान, आज दुपारी दोन वाजता चौक मंडई येथील जहांगीर मशीद समोरून जुलूस अर्थात मिरवणूक काढण्यात येणार आहे. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह विविध धर्मगुरू यांच्या नेतृत्वाखाली जुलूस काढण्यात येणार आहे. चौक मंडई येथून बागवानपुरा, भोईगल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अजमेरी चौक, चव्हटा, पठाणपुरा, बुधवार पेठ, आदम शहा चौक काजीपुर, मुलतानपुरा, कोकणीपुरा, इमाम अहमद रजा चौक, खडकाळी, दूध बाजार, शहीद अब्दुल हमीद चौक, पिंजर घाट, हुसैनि चौक मार्गे पवित्र बडी दर्गा शरीफ येथे सांगता होणार आहे.
यावेळी देशासह सर्वत्र शांतता राहावी तसेच सर्वांची प्रगती व्हावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात येणार आहे, तसेच इस्लामी पद्धतीने त्याचे समारोप करण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व धर्मीय बांधवांसाठी अन्नदानचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सकाळी बागवानपुरा चौकात अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुस्लिम बांधवांनी घरांसह सर्वत्र विद्युत रोषणाई केली आहे.
मुस्लिम बांधवांनी डोक्यावर इस्लामी टोपी घालून जुलूसमध्ये सामील व्हावे इतरांना त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी, रात्री दहा वाजेपर्यंत जुलूसची सांगता व्हावी, त्याचप्रमाणे घोषणाबाजी करताना फक्त इस्लामी घोषणा देण्यात याव्यात, जुलूसमध्ये शिस्तीने सामील व्हावे, महिलांनी जुलूसमध्ये गर्दी करू नये. त्याचप्रमाणे नमाज वेळ झाल्यावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करावे, मंडळांमध्ये अंतर राहणार नाही याची प्रत्येक मंडळांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन धर्मगुरूंनी केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




