नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वतीने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या (Plastic) वापराविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात असून मागील वर्षभरात अर्थात २०२४ मध्ये मनपाकडून वर्षभर प्रतिबंधित प्लास्टिक विरुद्ध कारवाईत (Action) एकूण २९ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर एकूण ५८२ केसेस करण्यात आले आहे.
शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतरही काही ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेला ही कारवाई करावी लागत आहे. प्रतिबंधित प्लास्टिकच्या मोहिमेत महापालिकेच्या पथकांनी अनेक व्यापारी, दुकानदार आणि विक्रेत्यांवर कारवाई करुन दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या वतीने सतत प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती केली जात असली तरी मोठ्याप्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होत असल्याने कारवाई करण्यात येते.शहरातील बाजारपेठा, शाळा, हॉटेल्स आणि विक्री केंद्रे येथे छापे (Raid) टाकून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे तर त्यांना दंड करण्यात आला आहे.
दरम्यान, शहराला प्लास्टिकमुक्त शहर बनवणे हा आमचा उद्देश आहे. नागरिकांनी (Citizens) पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात कारवाईसाठी मनपाकडून विभागनिहाय विशेष पथकांची निर्मीती करण्यात आली असून त्याद्वारे कारवाई करण्यात येत आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर प्रति कारवाई ५ ते २५ हजार रुपये दंड आकारण्यात येतो.
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा. नियम मोडणाऱ्यांवर मनपाकडून कारवाई सुरूच राहणार आहे. नाशिककरांनी या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देत पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे.
डॉ. आवेश पलोड, संचालक, मनपा घनकचरा विभाग
महिनानिहाय प्रकरणे आणि दंड
जानेवारी : ४ केसेस | २० हजार रुपये दंड |
फेब्रुवारी : २६ केसेस | १ लाख ४० हजार रुपये दंड |
मार्च : ४० केसेस | २ लाख ४० हजार रुपये दंड |
एप्रिल : ४९ केसेस | २ लाख ५० हजार रुपये दंड |
मे : ३९ केसेस | २ लाख रुपये दंड |
जून : ६२ केसेस | ३ लाख १० हजार रुपये दंड |
जुलै : २५४ केसेस | १२ लाख ९० हजार रुपये दंड |
ऑगस्ट : ३८ केसेस | १ लाख ९५ हजार रुपये दंड |
सप्टेंबर : ९ केसेस, | ४५ हजार रुपये दंड |
ऑक्टोबर : ३० केसेस, | १ लाख ६० हजार रुपये दंड |
नोव्हेंबर : ६ केसेस | ३० हजार रुपये दंड |
जानेवारी : २५ केसेस | २५ हजार रुपये दंड |