नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आकाशातून युद्धस्थितीवर नजर ठेवणारे पॅराग्लायडर्स, आठ हजार फूट उंचीवरून थेट रणभूमीकडे झेपावणारे जवान, तोफा आणि रॉकेट्सचा एकाचवेळी झालेला मारा, कानठळ्या बसविणारा आवाज आणि काही क्षणांत उद्ध्वस्त झालेले लक्ष्य… देवळालीतील (Deolali) शिंगवे बहुला फायरिंग रेंज बुधवारी अक्षरशः युद्धभूमी बनली होती. निमित्त होते, भारतीय लष्कराच्या ‘तोफची–२०२६’ या भव्य (Artillery Center) शक्तीप्रदर्शन व युद्धसराव प्रात्यक्षिकाचे.
देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरीच्या ‘फायरिंग रेंज’ वर शत्रूने कब्जा केलेल्या ‘हरभरा पॉइंट’सह विविध प्रातिनिधिक तळांवर हल्ल्याचे वास्तवदर्शी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रारंभी हवेतून पॅराग्लायडर्सद्वारे टेहळणी, त्यानंतर पॅराशूटर्स आणि पुढील टप्प्यात तोफा व रॉकेट लॉन्चरच्या साहाय्याने शत्रूच्या तळांचा संपूर्ण खात्मा करण्यात आला. अवघ्या काही मिनिटांत ‘शत्रू’ नेस्तनाबूत झाल्याचे उपस्थितांनी अनुभवले. देवळाली कॅम्पच्या स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडन्ट, अतिविशिष्ट सेवा मेडल प्राप्त लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रात्यक्षिक पार पडले.
दरम्यान, यावेळी न्यूझिलंडच्या वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे अधिकारी, पुण्यातील डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्सचे विद्यार्थी, नेपाळ आर्मी स्टाफ कोर्सचे अधिकारी तसेच भूदल, नौदल, वायूदलाचे वरिष्ठ अधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोनहिल हाथीमाथ्यावर जाळ अन् धूर
फाररिंग रेंजमधील (डोंगर) हेप, व्ही-कट, वॉल, स्टेप, कोनहिल, हाथधीमाथा, पोलिसमन हॅट, चहुला१, २, ३, माउंड व हरभरा वा प्रातिनिधिक शत्रू तळांवर समन्वयित हल्ला केला, शत्रूला गाफील ठेवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने धुर करण्यात आला व लक्ष्य उद्ध्वस्त होताच टाळ्यांच्या गजरात जवानांचे शौर्य आणि तोफखान्याच्या अचूकतेचे उपस्थितांनी कौतुक के ले. चेतक व चित्ता हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक हालचाली आणि आकाशातून झेपावणारे जवान पाहून उपस्थितांचा थरकाप उडाला, तर ‘ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली.
१५५ मि.मी.च्या ‘धनुष’ ची कमाल
या युद्धसरावासह अभ्यासात ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आणि अत्याधुनिक तोफांवर विशेष भर देण्यात आला. १२० एमएम मोर्टर, एम–७७७ हलकी तोफ, १०५ व १३० एमएम तोफा, १५५ एमएम बोफोर्स, धनुष, इस्रायली सोल्टम, यूएलएच-१५५, १५५ एमएम के–९ वज्र या स्वयंचलित तोफांसह भारतीय बनावटीच्या ‘पिनाका’ मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चरमधून अचूक मारा करण्यात आला. याशिवाय रशियन बीएम–२१ आणि स्मर्ज रॉकेट प्रणालीची माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिकादरम्यान नऊ ते दहा किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर काही सेकंदांत हल्ला चढविण्याची क्षमता दाखवण्यात आली. सुरुवातीला प्रत्येक तोफेचे स्वतंत्र प्रात्यक्षिक झाले, तर अखेरीस सर्वच ताेफांनी एकाचवेळी बाॅम्ब गाेळ्यांचा वर्षाव करुन शत्रूची तळं उद्ध्वस्त केले.
मुद्दे
- आठ हजार फूट उंचीवरून सहा पेंटग्लायडर्स उडी
- चिता हेलिकॉप्टरमधून रणभूमीवर १२० एमएन मोर्टर पोहोचविण्याचे प्रात्यक्षिक
- बोफोर्समधून ३१ किमी, धनुषमधून ३६ विभीपर्यंत नारा
- वज्रची ३८ किमी मारकक्षमता, अच्या २३ सेकंदात गोळीबार
- पिनाका रॉकेट लॉन्वरमधून एका वेळी सहा रकिट्सचा मारा
- ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी





