नाशिक | प्रतिनिधी
घरासमोर दारू पिण्यास मनाई केल्याचा राग आल्याने त्रिकुटाने सहायक पोलीस उपनिरिक्षकास मारहाण करत चाकूने जखमी केल्याची घटना उपनगरच्या कॅनॉलरोड परिसरात घडली.
दत्ता हिरोडे (रा. आम्रपाली झोपडपट्टी) व त्याचे दोन साथीदार (पुर्ण नाव नाही) अशी मारहाण करणार्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरिक्षक पी. ए. परदेशी यांनी तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार अधिक माहिती अशी की, रविवारी हल्लेखोर संशयित परदेशी यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत मद्य प्राशनासाठी बसले होते.
यावेळी परदेशी यांनी त्यांना या ठिकाणी दारू पिण्यास मनाई केली असता याचा राग आल्याने त्रिकुटाने शिवीगाळ करत लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली.
तसेच चाकूने हल्ला केला. यामध्ये परदेशी यांच्या कमरेला तसेच हातास गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास परदेशी करत आहेत.




