नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘धकाधकीच्या आणि पैशाच्या मागे पळणाऱ्या आजच्या जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे,’ याचा प्रत्यय नुकताच नाशिकच्या (Nashik) गोदातीरी आला. अधिक मासानिमित्त देवदर्शनासाठी छत्तीसगडहून आलेल्या एका सराफ व्यावसायिकाची लाखो रुपयांचे सोने आणि रोकड असलेली बॅग रिक्षात विसरली. मात्र, नाशिकच्या एका ज्येष्ठ रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा आणि नाशिक पोलिसांच्या ‘स्मार्ट’ तत्परतेमुळे ही बॅग अवघ्या काही तासांत संबंधित कुटुंबाला सुखरूप परत मिळाली. या घटनेमुळे नाशिककरांच्या आदरातिथ्याची आणि खाकी वर्दीच्या कार्यतत्परतेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
रायपुर (छत्तीसगड) येथील सोन्या-चांदीचे (Gold and Silver) व्यापारी प्रवीण संपतलाल सोनी (४३) हे वयोवृद्ध आई, पत्नी व मुलीसह नाशिकला देवदर्शनासाठी आले होते. अनोळखी शहर आणि वाहतुकीची कोंडी यामुळे त्यांनी आपली कार एका ठिकाणी पार्क केली आणि रामकुंडावर जाण्यासाठी रिक्षा पकडली. रामकुंडावर स्नानासाठी उतरताना घाईगडबडीत ते सोन्याच्या लगडी असलेली बंग रिक्षातच विसरले. प्रवासी उतरून गेल्यावर रिक्षाचालक देवीदास शिवदास देशमुख (६०) यांना पाठीमागे एक बेवारस बॅग दिसली.
त्यांनी ती उघडून पाहिली असता त्यात कपड्यांसोबत तब्बल ४३ हजार रुपयांची रोकड (Cash) आणि ६३४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन महागड्या लगडी (वजनाच्या पावत्यांसह) होत्या. एवढी मोठी रक्कम आणि सोने पाहूनही देशमुख यांचे मन डगमगले नाही. त्यांनी तात्काळ ती बॅग सुरक्षितपणे सरकारवाडा पोलीस ठाण्यात जमा केली. बॅगेत मिळालेल्या पावत्यांवरील नंबरवर पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. यावर सरकारवाडा पोलिसांनी एक नामी युक्ती लढवली. त्यांनी आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या अधिकृत व्हाट्सप ग्रुप्सवर या बेवारस बॅगेची माहिती आणि संदेश तातडीने प्रसारित केला.
दरम्यान, हवालदिल झालेले सोनी कुटुंब तक्रार देण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) पोहोचले होते. व्हाट्सप संदेशामुळे पंचवटी पोलिसांनी त्यांना तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाठवले. तिथे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी योग्य ती खात्री करून घेतली आणि व्यापारी प्रवीण सोनी यांच्या स्वाधीन त्यांची मौल्यवान बेंग केली. मुंबईतील कारागिराकडून दागिने बनवण्यासाठी हे सोने आणल्याचे सोनी यांनी सांगितले.
पोलिसांची भूमिका महत्त्वाची
कृतज्ञता : एवढ्या कमी वेळेत आमचे दागिने आणि पैसे परत मिळतील असे वाटले नव्हते. नाशिकचे रिक्षाचालक देशमुख आणि नाशिक पोलीस आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आले, अशा भावना सोनी कुटुंबियांनी व्यक्त केल्या. या कामगिरीत हवालदार चंदर दळवी, अमलदार संदीप उघडे आणि महिला अमलदार सुवर्णा आव्हाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




