सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
शहरातून जाणान्या पुणे महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर दुचाकीने रस्त्यावरून (Road) जाणाऱ्या महाविद्यालयीन युवकाच्या (Youth) गळ्यात नायलॉन मांजा अडकून त्याच्या हाताची करंगळी कापल्याची गंभीर घटना शुक्रवारी (दि.३) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. गळ्यात मांजा (Manja) अडकताच हाताने पकडल्याने या युवकाचा गळा थोडक्यात बचावला. परंतु त्याच्या हाताच्या करंगळीला मोठी जखम झाल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली.
तालुक्यातील बडगाव-सिन्नर येथील शुभम कैलास सानप (१८) हा युवक सिन्नरच्या आयटीआयमध्ये शिक्षणासाठी (ITI Education) येतो. शुक्रवारी सायंकाळी आयटीआय सुटल्यानंतर तो दुचाकीने घराकडे परत जात होता. यावेळी नायलॉन मांजा त्याच्या गळ्यात अडकला.शुभमने तातडीने प्रसंगावधान राखून हात घातल्याने गळा वाचला. गळ्याला किरकोळ ओरखडले गेले. मात्र नायलॉन मांजाने शुभमची करंगळी कापली गेली. त्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
दरम्यान, जखमी शुभमला तातडीने सिन्नरच्या चैतन्य रुग्णालयात उपचारासाठी (Treatment) दाखल करण्यात आले. त्याच्या डाव्या हाताच्या करंगळीचे टेंडन तुटल्याने हालचाल बंद झाली होती. डॉ. संदीप शिंदे आणि डॉ. विपुल काळे यांनी तातडीने त्याच्या करंगळीवर शस्त्रक्रिया केली. जीवावर बेतले होते, मात्र करंगळीवर निभावले अशीच घटनेनंतर प्रत्यक्षदर्शीची भावना होती.
महिनाभरात १० वी घटना
नायलॉन मांजाने पतंग उडवण्याचा शौक सिन्नरकरांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे. कटलेला पतंग दुचाकी चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. गेल्या महिनाभरात मांजामुळे जखमी झालेल्यांची संख्या दहाच्या पुढे गेली आहे. पतंगशौकिन सर्रास नायलॉन मांजाचा वापर करत असतानाही प्रशासन हातावर हात धरून बसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पशु-पक्ष्यांनाही नायलॉन मांजाचा फटका बसत असून जिथे माणूसच सुरक्षित नाही, तेथे या पशू-पक्ष्यांच्या जखमी होण्याशी कुणाला घेणे आहे, अशी चर्चा शहरात। होत आहे.