नाशिक | Nashik
महाराष्ट्राचे (Maharashtra) भरतपूर तसेच जागतिक दर्जाचे रामसर स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर (Nandur Madhmeshwar) वन्यजीव अभयारण्यात आज (रविवार) पावसाळापूर्व पक्षी प्रगणना उत्साहात पार पडली. अभयारण्यातील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास करणे, तसेच स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी प्रजातींची अचूक नोंद घेण्यासाठी नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव विभागाच्या वतीने या विशेष पक्षी प्रगणनेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत करण्यात आलेल्या या प्रगणनेत विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, नाशिक (Nashik) सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य, स्थानिक नागरिक आणि पक्षीमित्रांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
नाशिक ते नांदूर मध्यमेश्वर भव्य सायकल रॅली
या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट आणि नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ते अभयारण्य अशी भव्य सायकल रॅली काढण्यात आली. नाशिक सायकलिस्टचे अमित घुगे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे नेटके नियोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये सुमारे ११० सायकलस्वार सहभागी झाले होते. सायकलस्वारांनी मार्गात ठिकठिकाणी नागरिकांना प्रदूषणमुक्ती आणि पक्षी संवर्धनाचे आवाहन करत पर्यावरण जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व यशस्वी नियोजन
सदर पक्षी प्रगणना उपवनसंरक्षक (वन्यजीव) श्री. कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक श्री. हेमंत उबाळे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. हिरालाल चौधरी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि नियोजनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
६० हून अधिक प्रजाती आणि ६,२१५ पक्ष्यांची नोंद
या प्रगणनेदरम्यान अभयारण्यात स्थानिक पाणपक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आढळून आला. यामध्ये प्रामुख्याने खालील वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांच्या सुमारे ६० हून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली. प्रमुख स्थानिक पाणपक्षी व अन्य प्रजाती: चित्रबलाक (Painted Stork), चमचा (Eurasian Spoonbill), हळदीकुंकू बदक (Spot-billed Duck), जांभळी पाणकोंबडी (Purple Swamphen), गडवाल (Gadwall), हळद्या (Golden Oriole), राखी बगळा (Grey Heron), सुगरण (Baya Weaver), उघड्या चोचीचा करकोचा (Asian Openbill), शेराटी (Glossy Ibis), पांढऱ्या मानेचा करकोचा (Woolly-necked Stork), लहान पाणकावळा (Little Cormorant), कपाशी घार (Black-winged Kite), खंड्या (kingfisher),.बिटर्न’ (Bittern) , नदीसुराय (river turn) आणि मोठ्या संख्येत वारकरी (comman coot ) , कापशी बदक इत्यादी पक्षी दिसून आले.
पक्षीमित्र आणि वन कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग
पक्षी प्रगणनेच्या क्षेत्रीय समन्वयात व माहिती संकलनात पक्षीमित्र यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण मोहिमेत वन कर्मचारी, वन्यजीव रक्षक, संरक्षण मजूर, निसर्ग मार्गदर्शक (नेचर गाईड्स) तसेच स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये प्र.भा. वनपाल कैलास सदगीर, नियत क्षेत्र अधिकारी गोरख पाटील, पक्षीमित्र भीमराव राजोळे, अनंत सरोदे, डॉ. अनिल माळी, प्रा. आनंद बोरा, आदिती शेरे, मिलिंद पेटकर, विजय बर्वे, स्वाती देसाई, निलेश देसाई, वेद शिंदे, सर्वेश शिंदे, बी. डी. चौधरी, सिलका चौधरी, पक्षीमित्र सचिन पाटील, समीर बोंदार्डे ,अनिल पाटील ,गंगाधर आघाव, सुनील जाधव, संजीव गायकवाड, अमोल दराडे, रोहित मोगल, रोशन पोटे, विकास गारे, पंकज चव्हाण, मनोज वाघमारे आणि गणेश वाघ आदींचा समावेश होता. पक्षी संवर्धन, गोदावरी-कडवा नदीकाठच्या जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही पक्षी प्रगणना आणि सायकल रॅली अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक ठरल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
एकूण पक्षी संख्या वर्गीकरण
पाणथळ पक्षी (Waterbirds) : ४,७७८
झाडांवरील पक्षी (Terrestrial Birds) : १,४३७
एकूण नोंदवलेले पक्षी : ६,२१५
या हंगामात असलेल्या पंक्ष्यांची संख्या आणि प्रजातीची जैवविविधता हे गेल्या वर्षभर अभयारण्य व्यवस्थापनाने रबिवलेल्या अधिवास संवर्धन आणि संरक्षण कामाचे यश म्हणाव लागेल. नांदूर मध्यमेश्वराला आता केवळ हंगामी पक्षी दिसत नसून वर्षभर पक्षी दर्शन होत आहे. तेव्हा पक्षीप्रेमींनी अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
- हिरालाल चौधरी ( वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूर मध्यमेश्वर )




