नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असून, ६० लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे. अशा धर्मांध लोकांची, प्रतिगामी लोकांची यादी तयार करायला सुरुवात केली असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या प्रबोधनाच्या मार्गावर महिलांचा अभाव असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शरद पवारांच्या या वक्तव्यावरून भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी टीका केली आहे.
ते म्हणाले की,”हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे. वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोंडण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे. जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून त्या लोकांसोबत इफ्तार पार्ट्या झोडतात ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही. पण राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागलेला आहे. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थान केली आणि आता ४०-५० लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे. पण एक लक्षात ठेवा हा तुषार भोसले जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत तो तुमचे षडयंत्र शिजू देणार नाही” असं तुषार भोसले यांनी म्हटले.
नेमकं काय म्हटले?
दिल्लीत महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन सुरू असून, या साहित्य संमेलनात सौदामिनी नावाची स्मरणिका तयार करण्यात आली आहे. त्या स्मरणिकेत महिलांचे सक्षमीकरण हेच माझं स्वप्न अशा आशयाचा लेख शरद पवार यांनी लिहिलेला आहे. याच लेखात शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने भाष्य केले आहे. त्यांनी वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये ६० टक्के लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. त्यामुळे आम्ही यादी तयार करत असून, त्यात साधारणता चाळीस लोक हे वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडताना दिसतात. त्यांची अत्यंत गरज असून, या प्रबोधनाच्या मार्गावर दुर्दैवाने कुठेही महिला दिसत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.





