मुंबई | Mumbai
शिवसेनेतील खासदारांच्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. थोडक्यात पण प्रभावी शब्दांत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संदेश दिला. संकटे कितीही आली तरी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या काव्यपंक्तींच्या माध्यमातून अधोरेखित केले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी वडील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या प्रेरणादायी कवितेतील ओळी पोस्ट केल्या.
ही सर्व वजाबाकी होत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र गोळाबेरीज पुन्हा मांडली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात मराठीतील सुप्रसिद्ध कवी, वि. वा शिरवाडकर यांच्या त्या प्रसिद्ध कवितेच्या सुरुवातीच्या ओळी लिहित त्यांनी मोठा संदेश दिला आहे. कितीही संकटं आली तरी आता थांबायचे नाही. नवीन काही तरी घडवत राहायचं, असा संदेश त्यांनी या ओळीतून दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा तो फोटो आणि त्याखाली कविवर्य कुसुमाग्रजांच्या त्या ओजस्वी ओळीतून त्यांनी परिणामकारक संदेश आज वर्धापन दिनाच्या काही तास अगोदर दिला आहे.
Omraje Nimbalkar: भावनिकदृष्ट्या चुकीचा, तरी…; अखेर ओमराजे निंबाळकरांनी सोडलं मौन, म्हणाले…
काय म्हंटले आहे पोस्ट मध्ये?
“किरणांचा उघडून पिसारा, देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी…” या काव्यपंक्तींच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी अंधारानंतर प्रकाशाचा मार्ग शोधण्याचा संदेश दिला. राजकीय संकटे आणि अडचणींच्या काळातही हार न मानता नव्या उमेदीने पुढे जाण्याचा त्यांचा निर्धार या पोस्टमधून दिसून आला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या काही तास आधी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.
उद्धव ठाकरेंच्या या पोस्टकडे अनेकजण नव्या सुरुवातीचा संकेत म्हणून पाहत आहेत. संकटांनंतर पुन्हा संघटना उभी करण्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या संदेशातून दिसून येत आहे. कुसुमाग्रजांच्या प्रेरणादायी शब्दांद्वारे त्यांनी समर्थकांना एकच संदेश दिला आहे की संघर्ष संपलेला नाही, प्रवास अजून बाकी आहे आणि नव्या ताकदीने पुढे जायचे आहे.




