नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
अंबड औद्योगिक वसाहतीतील (Ambad Industrial Estate) एक्स्लो पॉइंट चौक परिसरातील रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कामटवाडे येथील व्यावसायिक निलेश प्रल्हाद कोतकर (४०) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी (दि.२८) दुपारी दिड वाजेच्या सुमारास निलेश कोतकर हे अंबड औद्योगिक वसाहतीतून जेवणासाठी घरी जात होते. एक्स्लो पॉइंट चौकातील रस्त्यावरील मोठा खड्डा (Pothole) चुकविताना त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन ती घसरली. या अपघातात (Accident) त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कोतकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने कामटवाडे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या (Citizen) जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या महापालिकेच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच मृत निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.




