नाशिक | Nashik
नदी स्वच्छता, साधुग्राम, पायाभूत सुविधा, स्रणालय यासह विविध विकास कामांचा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela 2027) नियोजनात समावेश करण्यात यावा, याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना (Collector and Municipal Commissioner) पत्र दिले.
भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात (letter) म्हटले आहे की, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यामध्ये ५ कोटी भाविक-पर्यटक येणे अपेक्षित आहे. कुंभमेळा यशस्वीरीत्या पार पाडावा, यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर दळण वळण, परिवहन, पाणीपुरवठा, राहण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, विद्युतव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, वाहनतळ व्यवस्था इत्यादी सुविधा पुरविण्याच्या दृष्ट्टीने नियोजन आणि त्याची प्रभावशाली अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारी संदर्भात मुख्यमंत्री (CM) तथा अध्यक्ष, नाशिक कुंभमेळा शिखर समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. १७ जानेवारी २०२५ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. ज्यात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) नियोजनात सामावून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले असल्याचे म्हटले आहे.
गोदावरी नदी स्वच्छता
गोदावरी स्वच्छतेसारख्या महत्वाच्या विषयाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. गोदापात्रामध्ये शहर परिसरातील उद्योगांसह निवासी भागातील सांडपाणी सुद्धा मिसळत असल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाळी पाण्याच्या बाहिन्यांमधूनही गोदावरीमध्ये सांडपाणी जाते. शहरातील प्रमुख ५० पैकी सुमारे २५ ठिकाणांवर ड्रेनेजचे सर्रास सांडपाणी गोदावरीमध्ये सोडले जात आहे. ड्रेनेजचे सांडपाणी तत्काळ बंद करून भूमिगत गटारींना जोडले जावेत. सिंहस्थामध्ये केवळ एसटीपींची संख्या वाढविणेच पुरेसे नाही तर गोदापात्रात सांडपाणी सोडणारी केंद्रे त्वरित बंद करून गोदापात्रातील पाणी दूषित होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजनेचा सिंहस्थ आराखड्यामध्ये समावेश करावा. त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थ स्वच्छता-त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थमध्ये पाणी स्वच्छ करणारे यंत्र बसवावे. त्र्यंबकेश्वरमधून वाहणाऱ्या गोदावरीची स्वच्छता करण्यात यावी.
साधुग्राम जागेवर पायाभूत सुविधा
महानगरपालिकेच्या मालकीच्या साधुग्राम जागेवर प्रगती मैदानच्या धर्तीवर कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. येथील पाणीपुरवठ्याची व्यवस्था, पथदीप, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छतागृहे आदी पायाभूत सुविधांचा ११ वर्षे विविध प्रदर्शन व समारंभासाठी वापर होईल आणि त्याच सुविधाचा एक वर्ष सिंहस्थासाठी वापर होईल. कायमस्वरूपी सुविधांमुळे दर बारा वर्षांनी पुन्हा-पुन्हा होणारा खर्च बचत होईल आणि या जागेद्वारे अकरा वर्ष महापालिकेला उत्पन्न मिळू शकेल असेही त्यांनी म्हटले आहे.
रिंगरोड
मागील सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये तयार केलेले शहराच्या बाहेरील आणि शहरांतर्गत असलेले दोन्ही रिंगरोडचे रुंदीकरण करून या रस्त्यांची सुधारणा करावी.