Friday, March 13, 2026
Homeमुख्य बातम्याDevendra Fadnavis : म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती - CM फडणवीस

Devendra Fadnavis : म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती – CM फडणवीस

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक महानगरपालिकेच्या पहिल्या ‘हरित महानगरपालिका रोख्यांच्या’ (ग्रीन बाँड्स) सार्वजनिक विक्रीचा शुभारंभ आज (सोमवारी) सकाळी मुंबई येथील ‘भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार’ येथे करण्यात आला. या सोहळ्याला नाशिकच्या महापौर हिमगौरी अहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह नाशिकमधील (Nashik) विविध लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. पर्यावरणपूरक विकासकामांसाठी निधी उभारण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील महानगरपालिकांनी म्युनिसिपल बाँड मार्केटचा अधिकाधिक वापर करावा, यावर नेहमीच भर दिला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने योजना जाहीर करून पहिल्या टप्प्यात दोनशे कोटींपर्यंतचे बाँड्स काढण्यास मान्यता दिली होती. या उपक्रमाच्या यशानंतर, नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महानगरपालिकांना एक हजार कोटींपर्यंत म्युनिसिपल बाँड्स काढण्याची मुभा दिली आहे. त्याचबरोबर त्यासाठीचा इन्सेंटिव्हदेखील २० कोटी पासून दोनशे कोटीपर्यंत नेण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) अवघ्या एका वर्षात दुसऱ्यांदा म्युनिसिपल बाँड इश्यू करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पब्लिक इश्यूच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका कुंभमेळ्याशी संबंधित प्रकल्पांसह नागरी विकासाच्या विविध उपक्रमांसाठी म्युनिसिपल बाँडद्वारे निधी उभारणी करत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. येत्या दीड वर्षांत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सुमारे २५ हजार कोटींची विविध विकासकामे होणार आहेत. कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारले जाणारे हे प्रकल्प केवळ तात्पुरते नसून, दीर्घकालीन स्वरूपात नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे ठरणार आहेत. त्यामुळे भविष्यात नाशिक हे गुंतवणुकीचे आकर्षण केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नाशिक महानगरपालिकेने अशाच अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून शहर विकासात गुणात्मक आणि दर्जात्मक परिवर्तन घडवून आणत राहावे. या उपक्रमासाठी नाशिकच्या महापौर, कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) आयोजनाशी संबंधित सर्व अधिकारी आणि संपूर्ण टीमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. तसेच या बाँड इश्यू प्रक्रियेत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली असून विविध वित्तीय संस्थांनीही मोलाचे सहकार्य केले आहे.

ताज्या बातम्या