नाशिक | Nashik
शहरातील रस्त्यांची (Roads) दुरवस्था, खड्यांमुळे (Potholes) झालेल्या अपघातांची मालिका आणि सिंहस्थाच्या विकासकामांचा वाढता वेग या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शुक्रवारी (दि.७) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) सिंहस्थ कुंभमेळ्याचा उच्चस्तरीय आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून नाशिक महानगरपालिकेसह सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुपारी १२ वाजता होणाऱ्या या बैठकीत (Meeting) दोन्ही उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, महसूल आणि वन विभागाचे अपर मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), नाशिक महापालिका आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सिंहस्थाच्या विकासकामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून आतापर्यंत प्रभाकर निकम, प्रवीण गायकवाड, दीपाली बेळे आणि नीलेश कोतकर या चौघांचा खड्ड्यांशी संबंधित अपघातांत मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून महापालिका प्रशासनाविरोधात (NMC) आंदोलन सुरू आहे.
अधिकृत कार्यक्रमपत्रिकेत बैठकीचा विषय नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आढावा असा असला, तरी सिंहस्थाशी संबंधित रस्ते, पायाभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे आणि शहरातील खड्यांच्या गंभीर प्रश्नावरही या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना कडक सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. नाशिककरांचे (Nashik) लक्ष आता या बैठकीकडे लागले असून, केवळ आढावा न घेता रस्ते दुरुस्ती, कामांचा दर्जा आणि जबाबदार यंत्रणांबर ठोस निर्णय होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




