लोणी |वार्ताहर| Loni
स्वीडनच्या संसदेत (Sweden Parliament) खासदार म्हणून निला विखे पाटील (MP Nila Vikhe) यांच्या झालेल्या निवडीचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले आहे. आमच्या कुटुंबातील एक सदस्य एवढ्या मोठ्या पदावर निवडून जाणे ही अत्यंत गौरवास्पद बाब असून या यशाचा आनंद आमच्या कुटुंबाबरोबरच संपूर्ण लोणी ग्रामस्थांनाही आहे. तिथल्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत निला विखे पाटील यांनी दिलेल्या निरंतर योगदानाचेच हे मोठे यश आहे, अशी सार्थ प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
माध्यमांशी बोलताना ना. राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, निला विखे पाटील यांच्या निवडीचे वृत्त ऐकून आमच्या परिवाराला मनस्वी आनंद झाला आहे. पहिल्यापासूनच तेथील व्यवस्थेमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने सक्रिय राहून दिलेले योगदान खूप महत्त्वपूर्ण राहिले आहे. बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांचा प्रभावही निला विखे यांच्या कार्यपद्धतीमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. निला विखे यांनी यापूर्वी स्टॉकहोम नगरपरिषदेतही लोकप्रतिनिधी म्हणून काम करून आपल्या प्रभावी कार्याची छाप पाडली होती.
निला विखे पाटील (Nila Vikhe) यांनी बालकल्याण आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातही स्वीडनमध्ये केलेले काम हे अत्यंत मार्गदर्शक ठरले आहे. यापूर्वी त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार (Sweden Prime Minister Advisor) म्हणूनही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी केलेल्या याच कामाची पावती या ऐतिहासिक यशामध्ये मिळाली असून, तेथील नागरिकांच्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्यात, याकरिता मी त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा देतो, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.




