Sunday, September 20, 2026
HomeनाशिकNashik News : सिंहस्थाच्या विकासकामांतून नाशिकचा कायापालट, ४० वर्षांची गरज लक्षात घेऊन...

Nashik News : सिंहस्थाच्या विकासकामांतून नाशिकचा कायापालट, ४० वर्षांची गरज लक्षात घेऊन नियोजन – मंत्री महाजन

केंद्र-राज्य सरकारकडून भरीव निधी

नाशिक | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरात (Nashik City) सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांमुळे शहराचा सर्वांगीण कायापालट होणार आहे. केवळ कुंभमेळ्यापुरती तात्पुरती व्यवस्था न करता पुढील ४० वर्षांची नाशिक शहराची गरज लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाने नाशिकच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून नाशिककरांना अभिमान वाटेल असे ‘नवे नाशिक’ घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन सिंहस्थ कुंभमेळा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले.

- Advertisement -

बारदान फाटा ते त्र्यंबक रोड या २४ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी ६६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील (City) प्रमुख रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांना गती देण्यात येत आहे.

कुंभमेळा म्हणजे केवळ धार्मिक पर्व नव्हे, विकासाची संधी,सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. लाखो भाविक, साधू-महंत, पर्यटक आणि नागरिक नाशिकमध्ये येणार असल्याने वाहतूक, रस्ते, पाणी, स्वच्छता, मलनिस्सारण, आरोग्य, पार्किंग, निवास, नदी संवर्धन आणि सार्वजनिक सुविधांचे नियोजन करण्यात येत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले .

कुंभमेळा (Kumbhmela) संपल्यानंतरही या सुविधांचा नाशिककरांना दीर्घकाळ लाभ मिळावा, यासाठी विकासकामांचे नियोजन केले जात आहे. कुंभमेळ्याची तयारी आणि शहराचा दीर्घकालीन विकास हे दोन्ही एकत्रितपणे साध्य करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

२४ मीटर रस्ता ठरणार महत्त्वाचा दुवा

बारदान फाटा ते त्र्यंबक रोड या मार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर परिसरातील वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीसह स्थानिक नागरिकांची दैनंदिन वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. ५ किलोमीटरच्या या रस्त्याच्या कामासाठी ६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

‘नव्या नाशिक’चा संकल्प

नाशिक शहराचा विकास हा केवळ शासनाचा विषय नसून नाशिककरांच्या सहभागातून हा बदल घडवायचा आहे. स्वच्छ, सुंदर, हरित आणि आधुनिक नाशिक अशी शहराची ओळख निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या सुविधांबरोबरच पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता, वृक्षारोपण आणि शहर सुशोभीकरणालाही महत्त्व देण्यात येत आहे.“कुंभमेळा काही महिन्यांचा; मात्र त्यातून उभा राहणारा विकास अनेक दशकांचा असला पाहिजे,” या दृष्टिकोनातून नाशिकच्या विकासाचे नियोजन करण्यात येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विभागांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, रिंग रोड, वाहतूक सुधारणा, त्र्यंबकेश्वर दर्शनपथ, विमानतळाचा विस्तार, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, नदी संवर्धन आणि साधुग्रामसह विविध सुविधांच्या उभारणीवर भर देण्यात येत असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी यावेळी सांगितले. यावेळी आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, नगरसेवक दिनकर पाटील, अमोल पाटील, भारती धिवरे, संगिता घोटेकर, कविता लोखंडे, उषा बेडकोळी, अंकिता शिंदे, इंदुबाई नागरे, माधुरी बोलकर, समाधान देवरे, विश्वास नांगरे तसेच माजी नगरसेविका लता पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : बेकायदेशीरपणे वृक्ष तोडणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका, खड्डे...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज (रविवारी) नाशिकमध्ये (Nashik) माध्यमांशी संवाद साधला असता दिशा सालियान प्रकरण,...