Monday, October 19, 2026
HomeनाशिकNashik News : भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी नाशिककरांनी २५ सप्टेंबरपर्यंत सूचना,...

Nashik News : भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी नाशिककरांनी २५ सप्टेंबरपर्यंत सूचना, अभिप्राय सादर करावेत – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक | Nashik

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासोबतच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी व संबंधित हितधारकांशी चर्चा करून भरती परीक्षा (Exam) पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय घेण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सर्व संबंधित घटकांनी १७ ते २५ सप्टेंबर २०२६, सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत) आपल्या सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांनी केले आहे.

- Advertisement -

या समितीचे अध्यक्ष व सदस्य ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे कामकाजाच्या अनुषंगाने भेट देणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (Nashik) येथे एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येत असून, हा कक्ष गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ पासून शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामकाजासाठी खुला राहणार आहे. सूचना व अभिप्राय सादर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक हे नोडल अधिकारी असतील. नागरिक, संस्था व संबंधित घटकांनी आपला अभिप्राय nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना शाखा, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे सादर करावेत.

विद्यमान परीक्षा प्रणालीचा आढावा, पारदर्शकता व सुरक्षिततेचे उपाय, प्रश्नपत्रिका ते निकाल प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, गैरप्रकारांना प्रतिबंध, उत्कृष्ट पद्धतींचा अभ्यास, परीक्षा केंद्रांसाठी किमान मानके, संस्थात्मक समन्वय आणि तक्रार निवारण प्रणाली या प्रमुख विषयांवर सूचना व अभिप्राय अपेक्षित आहेत. प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संकलन करून त्या शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहेत. समिती या शिफारशींचा सखोल अभ्यास करून राज्य शासनास सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे.

आपली सूचना अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल!” या उद्देशाने राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या प्रक्रियेत नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सर्व नागरिक, अभ्यासक, शैक्षणिक संस्था, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी व संबंधित घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...