धाराशिव । Dharashiv
मराठा आरक्षणाच्या तीव्र लढ्याने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सलग १४ व्या दिवशीही सुरू असून ते आपल्या मागण्यांवर आणि मुंबईत धडक देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
मात्र, या उपोषणा दरम्यान जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखावरून आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यामुळे सत्ताधारी शिंदेसेना अत्यंत आक्रमक झाली असून मंत्री योगेश कदम यांनी जरांगे पाटलांना जाहीर कडक इशारा दिला आहे.
धाराशिव शहरातील के.टी. पाटील शाळेत आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी आले असता, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना कदम म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आपल्या भाषेची मर्यादा ओलांडू नये. अशा प्रकारे एकेरी भाषेत होणारी टीका यापुढे अजिबात सहन केली जाणार नाही.”
योगेश कदम यांनी जरांगे यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “तुम्ही ज्या भागातून येता, कदाचित तिथे बोलण्याची अशी पद्धत किंवा भाषा असेल. परंतु, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसाठी अशा भाषेचा वापर केल्याने राज्यातील असंख्य शिवसैनिकांसह सामान्य मराठा बांधवांचीही मने दुखावली गेली आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या कोणत्याही नेत्याला अशी भाषा वापरणे शोभत नाही,” असे स्पष्ट शब्दांत कदम यांनी सुनावले.
यावेळी बोलताना योगेश कदम यांनी महायुती सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या विविध योजनांसाठी जेवढे भरीव काम केले आहे, तेवढे काम यापूर्वी कोणत्याही सरकारने किंवा नेत्याने केलेले नाही, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, एका बाजूला मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी येण्यावर ठाम असताना आणि दुसरीकडे महायुतीचे नेते त्यांच्या राजकीय भाषेवर आक्षेप घेत असल्याने हा संघर्ष आगामी दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




