नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मनपा आयुक्त असताना डॉ. अशोक करंजकर (Dr. Ashok Karanjkar) यांनी विविध वादग्रस्त निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर आरोप देखील झाले होते. यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा असतांना त्यांच्या काळात रातोरात काही ठराविक लोकांना भूसंपादनापोटी ५५ कोटी रुपयांचे धनादेश काढण्यात आले होते. त्याची आता चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाने चौकशीचे आदेश देत महापालिकेकडे (NMC) सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्तांसह आणखी कोण कोण त्यात अडकतात, याकडे लक्ष लागले आहे. नाशिक पूर्वचे भाजप आ. अॅड. राहुल ढिकले यांनी शासनाकडे त्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. नाशिक महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यासह विविध विकासकामांसाठी जमिनीवर आरक्षण टाकले आहे. भूसंपादन व त्याचा मोबदला अदा करणे यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी समिती नेमली होती.
भूसंपादनाचा (land Acquisition) मोबदला अदा करताना त्यात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होऊ नये, हा उद्देश होता. मात्र तत्कालीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी प्राधान्यक्रम समिती गुंडाळून बिल्डर लॉबीसाठी रात्रीतून ५५ कोटींचा भूसंपादनाचा धनादेश काढल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे प्रकरण तापले होते. हे प्रकरण अंगलट येणार हे लक्षात आल्यावर डॉ. करंजकर पंधरा दिवस वैद्यकीय रजेवर गेले होते. या प्रकारामुळे ज्या शेतक-यांच्या जमिनी विकासकामांसाठी अधिग्रहित केल्या; परंतु मोबदला अदा केला नाही, अशा बाधित शेतकऱ्यांनी आयुक्तांना घेराव घालत जाब विचारला होता. आता चौकशी सुरू होणार असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.