पुणे | Pune
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीच्या सरकारांच्या कामकाजाच्या पद्धतीवर जोरदार टीका केली. “जर तेच जुने सरकार आणि तीच जुनी कार्यसंस्कृती कायम राहिली असती, तर पुण्यात मेट्रो पोहोचण्यासाठी आणखी अनेक दशके लागली असती,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. २०१४ नंतर देशात मेट्रोच्या विस्ताराला वेग मिळाल्याचा दावा करत त्यांनी विकासकामांसाठी दूरदृष्टी आणि ठोस निर्णयांची आवश्यकता अधोरेखित केली. यावेळी मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे व्हर्च्युअल लोकार्पण करण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यातील चार नव्या मार्गिकांचे भूमिपूजनही झाले.
पुणे मेट्रोच्या २१,८०० कोटींच्या प्रकल्पांना गती
पुण्यातील या कार्यक्रमात सुमारे २१ हजार ८०० कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये ८ हजार ३०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या पुणे मेट्रो मार्गिका क्रमांक ३ चे लोकार्पण, तसेच सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या दुसऱ्या टप्प्यातील चार नव्या मार्गिकांचा समावेश आहे.
हिंजवडी-माण ते शिवाजीनगर या मार्गाला पुणे मेट्रोची पिंक लाइन म्हणून ओळखले जाते. सुमारे २३ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर २३ स्थानके आहेत.
मोदी म्हणाले, “पुणे मेट्रोच्या होत असलेल्या विस्तारामुळे प्रवाशांचा वेळही वाचत आहे आणि पुणेकरांना अधिक सुविधादेखील मिळत आहेत. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, जेव्हा शहराचा वेळ वाचतो, तेव्हा शहराची उत्पादकता वाढते आणि जेव्हा शहराची उत्पादकता वाढते, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते आणि जेव्हा अर्थव्यवस्था वाढते, तेव्हा गरीब आणि मध्मयवर्ग, या दोघांनाही त्याचा फायदा होतो.”
“बंधूंनो, आजचा हा दिवस ‘प्रो-पीपल, प्रो-एक्टिव्ह आणि गुड गव्हर्नन्स’चेही उदाहरण आहे. आपल्या देशात पहिली मेट्रो ही १९८४ मध्ये धावली होती. त्यानंतरच्या ३० वर्षांत केवळ २४८ किलोमीटर मेट्रो लाईन तयार झाली. महत्वाचे म्हमजे, देशात २०१४ पर्यंत देशात केवळ पाच शहरांमध्ये मेट्रो धावत होती. जर तीच जुनी मानसिकता कायम असती, जुने सरकार असते आणि जुनी कार्यसंस्कृती असती, तर पुण्यात मेट्रो पोहोचायला आणखी काही दशके लागली असती,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला.
मोदी म्हणाले, “२०१४ मध्ये जेव्हा देशाने एनडीएला सेवेची संधी दिली, तेव्हा आम्ही एका संकल्पाने पुढे चालतलो. तो संकल्प म्हणजे, शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या ‘ईज ऑफ लिविंग’चा आणि ‘ईज ऑफ ट्रान्सपोर्टेशन’चा होता आणि त्याचा परिणाम आज आपण बघत आहोत. गेल्या १२ वर्षांत देशातील मेट्रो ट्रान्सपोर्टचा कायकल्प झाला आहे. जेथे १०१४ मध्ये २४८ किलोमीटर मेट्रो रुट होता, तो आता वाढून सुमारे १२०० किलोमीटर झाला आहे. २०१४ मध्ये जेथे केवळ ५ शहरांमध्ये मेट्रो धावत होती, तेथे आज देशाच्या २६ शहरांमध्ये मेट्रो धावत आहे. आता रोज मेट्रोमध्ये १ कोटींहून अधिक लोक प्रवास करत आहेत. आज भारतीय मेट्रो नेटवर्क जगातील टॉप-३ मेट्रो नेटवर्कमध्ये गणले जाते.”




