Monday, October 26, 2026
HomeनाशिकEknath Shinde : राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ, सिंहस्थामुळे विकास अन् रोजगाराला चालना मिळणार...

Eknath Shinde : राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ, सिंहस्थामुळे विकास अन् रोजगाराला चालना मिळणार – DCM शिंदे

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा श्रेष्ठ असते. आम्ही कितीही राजकारणी असलो, तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी केले. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे आयोजित संत संमेलनात आणि आनंद कुंभमेळा कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisement -

या कार्यक्रमास शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आमदार सुहास कांदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नगरसेवक अजय बोरस्ते, बंटी तिदमे यांच्यासह देशभरातून आलेले विविध आखाड्यांचे साधू-महंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री भुसे व्यासपीठावर न बसता खाली साधू-महंत यांच्यासोबत बसल्याने शिंदेंनी “दादा भुसे हे संतांसोबत बसले असून, असा सहवास मिळणे हे अत्यंत भाग्याचे आहे,” असे म्हटले.

संतांच्या विचारांचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा” या अभंगाने करत भगवान त्र्यंबकराज, संत ज्ञानेश्वर, संत रामदास आणि गोदामाईला नतमस्तक होऊन अभिवादन केले. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणुकीची आठवण करून देत “समाजकारण हे राष्ट्रसेवेसाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी केले पाहिजे. त्यासाठी धर्म मजबूत असणे आवश्यक आहे” असे शिंदेंनी म्हटले.

शेतकरी, वारकरी आणि जनकल्याणाचे निर्णय

पुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ते मुख्यमंत्री असताना शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लागू करून महिलांना आर्थिक आधार दिला. पंढरपूरसह राज्यभरातील दिंड्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. गाईला राज्यमातेचा दर्जा बहाल केला, असे म्हटले. तसेच राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, अशा भागातील शेतकर्‍यांच्या मुलींच्या लग्नांचा खर्च शिवसेनेकडून केला जाईल, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे परिसराचा कायापालट

शिंदे पुढे म्हणाले, “काही लोक १२ वर्षांतून एकदा येणार्‍या कुंभमेळ्याच्या गरजेवर प्रश्न उपस्थित करत त्यासाठी एवढा खर्च का करत आहेत? असा सवाल करतात. परंतु, ही हजारो वर्षांची परंपरा असून, सिंहस्थ कुंभमेळा हा चांगल्या पद्धतीने पार पडेल.सिंहस्थ हा धार्मिक उत्सव असून या निमित्ताने एकात्मता आदर्श होईल. तसेच यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कुंभमेळा व त्र्यंबकेश्वर क्षेत्रासाठी शिंदेंनी केल्या मोठ्या घोषणा

तसेच सिंहस्थ कालावधीत सर्व १३ आखाड्यांतील साधू-महंतांच्या भोजनाची व्यवस्था शिवसेनेकडून केली जाईल. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल. साधू ग्रामसाठीच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला जाईल. अतिक्रमणात किंवा रस्ता रुंदीकरणात ज्या दुकानदारांचे गाळे आणि नागरिकांची घरे तोडली गेली आहेत, त्यांचे देखील पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासनही एकनाथ शिंदेंनी दिले. याशिवाय त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची क्षमता ५० वरून १०० खाटांची केली जाणार असून, त्र्यंबकेश्वर येथे क्रीडांगण व भवनाला मंजुरी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

साधू-महंतांचा सत्कार राजकीय आणि सामाजिक जीवनातील आनंददायी क्षण

आम्ही टीकेला कामातून उत्तर देतो. जगभरात या कुंभमेळ्याचा डंका वाजेल असा हा सोहळा यशस्वी करू. साधू-महंतांचा सत्कार करण्याची संधी मिळणे हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील सर्वात आनंददायी क्षण आहे.

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

ताज्या बातम्या

राज

“महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याची मी आतुरतेने वाट पाहतोय”;...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्रातील शहरांची बिघडलेली वाहतूक व्यवस्था, नियोजनशून्य विकास आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे....