जुने नाशिक | प्रतिनिधी
शहरातील जुने नाशिक परीसरातील अनेक रस्त्यांवर नियमित पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते, त्याचप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे मनपाकडून या ठिकाणी कारवाई करून ज्या नळांना तोट्या नाहीत, त्यांना तोट्या बसविण्याची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शहरातील सर्वात जुनी व भरगच्च लोकवस्तीचा भाग म्हणून जुने नाशिकची ओळख आहे. येथील नागरिक मोठ्याप्रमाणात पाण्याचा गैरवापर व अपव्यय करतात. येथील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी हे वेगवेगळ्या वेळेत येत असते. काही ठिकाणी सकाळी, काही ठिकाणी सकाळी तर काही दुपारी, संध्याकाळी नळांना मनपाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सर्व भागात सुरळीत पाणीपुखठा व्हावा, यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने हे नियोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा कमी अधिक दाबाने होतो. पाण्याचा योग्य पद्धतीने वापर ही काळाची गरज असली तरी जुने नाशिक परिसरातील अनेक भागात नागरिक बेशिस्त, बेजबाबदारपणे गैरवापर व अपव्यय करताना दिसून येत आहे.
यंदा पाऊस चांगला झाल्याने नाशिककरांवर पाण्याचे संकट नाही. याचाबत नागरिकांनी स्वतःच पुढाकार घेऊन पाणी ही काळाची गरज आहे, असे लक्षात घेऊन अपव्यय व गैरवापर टाळावा, असे मत सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे. महापालिकेतर्फे पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी व पाण्याबाबत जनजागृतीची आवश्यकता आहे. जुने नाशिक परिसरातील काझीपुरा, बागवानपुरा, चव्हाटा, आदमशाह चौक, बुधवारपेठ, मुल्तानपुरा, जोगवाडा, पिंजारघाट, चौक मंडई आदी भागातील रस्त्यांवर लोक गाड्या धुतात व नळांना तोटी नसल्याने पाणी थेट रस्त्यावरुन वाहते.
हे करावे लागेल
जनजागृती मोहीम घेऊन नागरिकांना रस्त्यावर कपडे किंवा भांडी धुणे थांबवण्यासाठी जागरूकता करावी.
मनपाने कारवाई करून ज्या ठिकाणी पाणी रस्त्यावर वाहते, तिथे पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी.
नळ दुरुस्ती अभियान राबवून गळके नळ आणि खराब जोडप्यांची दुरुस्ती करावी.
पाणी नियोजन सुधारणा करून पाणीपुरवठा वेळेवर आणि नियोजनबद्ध पद्धतीने करावा.
पाणी वाया जाणार नाही, यासाठी चोख नियोजन करण्यात यावा.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा