Wednesday, January 15, 2025
Homeक्राईमNashik News : पोलिसांच्या दिशेने गोळीबार?

Nashik News : पोलिसांच्या दिशेने गोळीबार?

उपस्थित पोलीस अंमलदारांसह बघ्यांचाही दावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सोनसाखळी चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावर (Police Team) संशयितासह (Suspected) नातलगांनी हल्ला करताना संशयिताने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याचीही चर्चा शहरात सुरु झाली आहे. परंतु, कारवाईवेळी हजर असलेल्या पोलिसांनीदेखील पथकाच्या दिशेने संशयिताकडून गोळीबाराचा (Firing) प्रयत्न झाल्याचे सांगत ‘काडतूस’ बंदुकीतच अडकल्याचा दावा केला आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणात भूमिका स्पष्ट करण्याऐवजी कानांवर हात ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

रविवारी (दि. ८) रात्री पोलीस पथकावर हल्ला (Attack) केल्याप्रकरणी किरण छगन सोनवणे (वय ३८, रा. पेठरोड) या सराईत गुन्हेगारासह त्याच्या कुटुंबातील संशयित अलका सोनवणे, रवींद्र सोनवणे, कुमार सोनवणे, सुनीता सोनवणे, वर्षा सोनवणे यांच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत गुन्हा नोंद आहे. किरणचा पाठलाग सुरु असताना त्याने पोलिसांच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. परंतु, गोळी बाहेर न पडता पिस्तुलात अडकल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गोळी पिस्तुलातून बाहेर न आल्याने गोळीबारासंदर्भातील गुन्ह्याची नोंद किंवा गोळीबाराचा उल्लेख फिर्यादीत केला नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, गत अडीच महिन्यांत शहरात सातत्याने पोलिसांवर हल्ले होत असल्याने नागरिकांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

पोलिसांवर हल्ल्याची हिंमत

पंचवटीत मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याचा पोटात चाकू खुपसण्यात आला. तर दुसऱ्यांदा कर्तव्यावरुन घरी जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने मद्यपींना रोखल्यावर त्यांच्या डोक्यात दगड मारण्यात आला. इंदिरानगर बोगद्याजवळ वाहतूक पोलिसालाही महिलेने मारहाण केली. यासह शहरात इतरही ठिकाणी पोलिसांवर धावून जाणे किंवा हल्ले करण्याचे प्रकार घडत असल्याने आयुक्तालयाने कठोर भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नेमके काय घडले?

पंचवटी पोलीस व गुन्हे शाखा युनिट एकचे पथक शनिवारी (दि. ७) रात्री साडेअकरा वाजेपासून अश्वमेधनगरात होते. त्यावेळी किरणने कमरेला गावठी पिस्तूल लावल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पळ काढताना रविवारी (दि. ८) मध्यरात्री किरण खड्यात पडला आणि पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी किरणचा भाऊ रवींद्रने पथकाशी हुज्जत घातली. इतर संशयितांनी आरडाओरड करून पोलिसांवर हल्ला केला. त्यामध्ये अंमलदार अमोल कोष्टी जखमी झाले. त्यावेळी पोलिसांच्या दिशेने गोळीबार झाल्याचा दावा अंमलदारांसह काही स्थानिकांनी केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या