Tuesday, October 6, 2026
HomeनाशिकNashik MC News : पाच विषय समित्यांसाठी विरोधकांचा एकही अर्ज नाही; बिनविरोध...

Nashik MC News : पाच विषय समित्यांसाठी विरोधकांचा एकही अर्ज नाही; बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, कुणी दाखल केले अर्ज?

मित्रपक्षांना दोन सभापतीपदांची संधी, भाजपकडे तीन समित्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या पाच महत्त्वाच्या विषय समित्यांच्या (Subject Committees) सभापती आणि उपसभापतीपदांच्या निवडणुका बिनविरोध (Unopposed) होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी (६) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या मुदतीत विरोधकांकडून एकाही पदासाठी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी होणारी निवडणूक केवळ औपचारिक ठरणार आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) ठरविलेल्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार पाचपैकी तीन सभापतीपदे भाजपकडे, तर दोन सभापतीपदे मित्रपक्षांकडे गेली आहेत.

- Advertisement -

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी भाजपच्या अॅड. कोमल मेहरोलिया यांनी, तर उपसभापतीपदासाठी चित्रा तांदळे यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे या समितीवर भाजपचेच दोन्ही पदाधिकारी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जागृती गांगुर्डे यांनी अर्ज दाखल केला आहे. उपसभापतीपदासाठी भाजपचे जयंत जाचक रिंगणात आहेत. या समितीच्या माध्यमातून मित्रपक्षाला सभापतीपद देण्यात आले आहे.

वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. पूनम महाले यांनी अर्ज दाखल केला असून, उपसभापतीपदासाठी भाजपचे सतीश निकम यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या समितीचे सभापतीपद शिंदे गटाकडे, तर उपसभापतीपद भाजपकडे राहणार आहे. विधी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपच्या जुई शिंदे यांनी, तर उपसभापतीपदासाठी अंकिता शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी प्रा. शरद मोरे आणि उपसभापतीपदासाठी सोनाली भंदूरे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

पाचही समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी सत्ताधारी गटातील (Group) उमेदवारांचेच अर्ज दाखल झाले असून, विरोधकांनी एकही अर्ज न भरल्याने या निवडींमध्ये आता प्रत्यक्ष निवडणुकीची शक्यता उरलेली नाही. त्यामुळे ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी संबंधित समित्यांच्या बैठकीत निवडीची घोषणा होण्याची औपचारिकता पार पडणार आहे.

शिक्षण समितीवरून भाजपमध्ये अंतर्गत खल

दरम्यान, शिक्षण समितीच्या सभापतीपदावरून भाजपमध्ये अंतर्गत खल झाल्याची चर्चा आहे. प्रारंभी सोनाली भंदूरे यांना सभापतीपद, तर प्रा. शरद मोरे यांना उपसभापतीपद देण्याचा विचार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मोरे यांची ही दुसरी टर्म असून शिक्षण क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता सभापतीपदाची संधी आपल्याला मिळावी, अशी भूमिका त्यांनी पक्षांतर्गत चर्चेत मांडल्याचे समजते. यानंतर पक्षांतर्गत पातळीवर चर्चा होऊन शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी प्रा. शरद मोरे यांचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अंतिम क्षणी शिक्षण समितीच्या पदांची रचना बदलल्याने या समितीच्या निवडीकडे महापालिका वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. शिक्षण समिती ही महापालिकेच्या शाळा, विद्यार्थ्यांच्या सुविधा, शैक्षणिक उपक्रम, शाळांच्या इमारती आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाची समिती असल्याने तिच्या सभापतीपदासाठी झालेली पक्षांतर्गत रस्सीखेच चर्चेचा विषय ठरली आहे.

मित्रपक्षांना प्रतिनिधित्व

महापालिकेतील संख्याबळामुळे भाजपला पाचही समित्यांची सभापतीपदे मिळविणे शक्य असतानाही सत्तेतील मित्रपक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्यानुसार महिला व बालकल्याण, विधी आणि शिक्षण या तीन समित्या भाजपकडे, तर शहर सुधारणा समिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आणि वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती शिवसेना शिंदे गटाकडे देण्यात आली आहे. उपसभापतीपदांमध्ये मात्र भाजपला अधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे समिती वाटपातून सत्ताधारी आघाडीतील समन्वयाचा फॉर्म्युला स्पष्ट झाला आहे.

८ आणि ९ ऑक्टोबरला निवडी

पाच समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ८ ऑक्टोबरला महिला व बालकल्याण आणि शिक्षण समितीच्या निवडी होतील. तर ९ ऑक्टोबरला शहर सुधारणा, विधी तसेच वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विरोधकांकडून एकही अर्ज नसल्याने सर्व निवडी बिनविरोध होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

ताज्या बातम्या